स्पोर्ट्स

पाकिस्तानच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये लाजिरवाण्या विक्रमांची नोंद! जाणून घ्या आकडेवारी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Pakistan Shameful Records : शान मसूदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला मुलतान कसोटीत इंग्लंडकडून एक डाव आणि 47 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह पाकिस्तानच्या नावावर एक लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात एका डावात साडे 500 हून अधिक धावा केल्यानंतर एक डावाच्या फरकाने सामना गमावणारा पाकिस्तान हा पहिला संघ ठरला आहे. आजपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 500 पेक्षा जास्त धावा केल्यानंतर कोणताही संघ पराभूत झालेला नव्हता.

कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि एका डावाने पराभूत झालेल्या संघांची यादी पाहिल्यास, पाकिस्तानपूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या नावावर होता. 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 492 धावा करूनही आयर्लंडचा संघ एका डावाच्या फरकाने हरला होता. या यादीत भारताच्या नावाचाही समावेश आहे. 2010 मध्ये, टीम इंडियाने 459 धावा करूनही दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सेंच्युरियन कसोटी डावाच्या फरकाने गमावली होती.

कसोटीत सर्वाधिक धावा करूनही डावाच्या फरकाने सामना गमावणारे संघ

मुलतान कसोटी (2024) : पाकिस्तान 556 धावा : इंग्लंड एक डाव आणि 47 धावांनी विजयी

गॅले कसोटी (2023) : आयर्लंड 492 धावा : श्रीलंका 1 डाव आणि 10 धावांनी विजयी

चेन्नई कसोटी (2016) : इंग्लंड 477 धावा : भारत 1 डाव 75 धावांनी विजयी

कोलकाता कसोटी (2011) : वेस्ट इंडिज 463 धावा : भारत एक डाव 15 धावांनी विजयी

सेंच्युरियन कसोटी (2010) : भारत 459 धावा : दक्षिण आफ्रिका एक डाव 25 धावांनी विजयी

प्रथम फलंदाजी करताना पराभवातील सर्वोच्च धावसंख्या

8 बाद 595 डाव घोषित : बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (वेलिंग्टन, 2017)

586 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (सिडनी, 1894)

556 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (ॲडलेड, 2003)

556 : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (मुलतान, 2024)

553 : न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड (नॉटिंगहॅम, 2022)

तिघांची शतके, पण तरीही पराभवाची नामुष्की

मुलतान कसोटीत पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफीक (102), कर्णधार शान मसूद (151) आणि आगा सलमान (104) यांनी शतके झळकावली. असे असतानाही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात तीन फलंदाजांनी शतके झळकावल्यानंतर संघ पराभूत होण्याची ही तिसरी वेळ आहे. पाकिस्तानसाठी ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 2022 मध्येही त्यांच्या तीन फलंदाजांनी इंग्लंडविरुद्धच्या रावळपिंडी कसोटीत शतके झळकावली होती, मात्र त्यादरम्यान त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 1992 मध्ये कोलंबो कसोटीत यजमान श्रीलंकेकडून तीन फलंदाजांनी शतके झळकावली होती, पण तरीही तो सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता.

पहिल्या डावात 500 पेक्षा जास्त धावा केल्यानंतर सर्वाधिक सामने गमावलेले संघ

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या डावात 500 हून अधिक धावा करूनही सामना गमावण्याची पाकिस्तानची ही पाचवी वेळ आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया (तीनवेळा) दुस-या स्थानी आहे. त्यानंतर इंग्लंड (दोन), न्यूझीलंड (दोन) आणि बांगलादेश (दोन) यांचा क्रमांक लागतो.

पहिल्या डावात 500 हून अधिक धावा करूनही सामना गमावणारे संघ

पाकिस्तान : 5 पराभव

ऑस्ट्रेलिया : 3 पराभव

इंग्लंड : 2 पराभव

न्यूझीलंड : 2 पराभव

बांगलादेश : 2 पराभव

घरच्या मैदानावर पाकिस्तानचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव

एक डाव आणि 156 धावांनी पराभव : विरुद्ध वेस्ट इंडिज (लाहोर, 1959)

एक डाव आणि 131 धावांनी पराभव : विरुद्ध भारत (रावळपिंडी, 2004)

एक डाव आणि 99 धावांनी पराभव : विरुद्ध ऑस्ट्रेलिया (रावळपिंडी, 1998)

एक डाव आणि 120 धावांनी पराभव : विरुद्ध भारत (मुलतान, 2004)

एक डाव आणि 47 धावांनी पराभव : विरुद्ध इंग्लंड (मुलतान, 2024)

आशिया खंडात इंग्लंडचा सर्वात मोठा कसोटी विजय

1976 नंतर आशियातील इंग्लंडचा हा सर्वात मोठा विजय आहे. 48 वर्षांपूर्वी इंग्लिश संघाने दिल्ली कसोटीत भारताचा एक डाव आणि 25 धावांनी पराभव केला होता.

  • भारताविरुद्ध एक डाव आणि 25 धावांनी विजय : दिल्ली, 1976

  • पाकिस्तानविरुद्ध एक डाव आणि 47 धावांनी विजय : मुलतान, 2024

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT