स्पोर्ट्स

Shaheen Afridi Ball Tampering : बॉल टेम्परिंगचा वादात अडकला शाहीन आफ्रिदी, लाजिरवाण्या कृतीने क्रिकेट जगतात खळबळ, VIDEO व्हायरल

Pakistan Cricket Controversy : पंच सरसावले, चेंडूची कसून तपासणी

रणजित गायकवाड

लाहोर : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी एका नव्या वादात सापडला आहे. सोशल मीडियावर शाहीनचा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, त्यात तो चेंडूशी छेडछाड (बॉल टेम्परिंग) करताना दिसून येत आहे. या प्रकारामुळे क्रिकेट वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून शाहीनवर टीकेची झोड उठत आहे.

नेमकी घटना काय?

सोमवारी (११ मे) कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना ही घटना घडली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहीन आफ्रिदी चेंडू आपल्या बुटांखाली दाबताना स्पष्टपणे दिसत आहे. शाहीनच्या बुटांच्या स्पाइक्समुळे चेंडूचा आकार बिघडू शकतो किंवा तो एका बाजूने खरखरीत होऊ शकतो, असा दावा केला जात आहे. विकेट मिळवण्यासाठी शाहीनने जाणीवपूर्वक चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप नेटकऱ्यांकडून केला जात आहे.

पंच सरसावले, चेंडूची कसून तपासणी

हा प्रकार निदर्शनास येताच मैदानावरील पंचांनी तत्काळ हस्तक्षेप केला. पंचांनी शाहीन आफ्रिदीकडून चेंडू ताब्यात घेऊन त्याची बारकाईने पाहणी केली. बऱ्याच वेळ तपासणी केल्यानंतर चेंडूच्या स्थितीत कोणताही गंभीर बदल किंवा आक्षेपार्ह खुणा न आढळल्याने पंचांनी सामना पुढे सुरू ठेवण्याची परवानगी दिली. पंचांनी शाहीनला क्लिन चिट दिली असली तरी, सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी मात्र त्याच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सामन्याची सद्यस्थिती

सामन्याचा विचार करता, बांगलादेशने पहिल्या डावात ४१३ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात पाकिस्तानने चिवट झुंज दिली असली तरी, ते अद्याप बांगलादेशच्या धावसंख्येपेक्षा २७ धावांनी मागे आहेत. पाकिस्तानकडून पदार्पण करणाऱ्या अजान अवैसने १०३ धावांची शानदार शतकी खेळी साकारली. त्याला अब्दुल्ला फझल (६०), सलमान अली आगा (५८) आणि मोहम्मद रिझवान (५९) यांनी मोलाची साथ दिली. फलंदाजांच्या कामगिरीनंतरही पाकिस्तानचा संघ पहिल्या डावातील पिछाडी भरून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. या वादाच्या सावटाखाली आता सामन्याचा अंतिम निकाल काय लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT