डरबन : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक फलंदाज शेफाली वर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. अवघ्या १५ व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या शेफालीने आता वयाच्या २२ व्या वर्षी १०० आंतरराष्ट्रीय टी-२० (T20I) सामने खेळणारी सर्वात तरुण भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारी शेफाली आता भारतीय क्रिकेटचा खऱ्या अर्थाने 'भविष्यकाळ' म्हणून उदयाला आली आहे.
रविवारी (१९ एप्रिल) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मैदानात उतरताच शेफालीने हा भीमपराक्रम केला. वयाची २२ वर्षे आणि ८१ दिवस पूर्ण असताना तिने हा टप्पा गाठला आहे. यासह तिने आपली सहकारी खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स हिचा विक्रम मोडीत काढला आहे. जेमिमाच्या नावावर २०२४ च्या महिला आशिया चषकादरम्यान २३ वर्षे आणि ३२७ दिवस वय असताना १०० टी-२० सामने खेळण्याचा विक्रम होता. जागतिक स्तरावर विचार केला तर, १०० सामने खेळणारी शेफाली ही जगातील तिसरी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. तिच्यापुढे केवळ रवांडाच्या गिसेले इशिमवे आणि हेन्रिएट इशिमवे यांची नावे आहेत.
भारताकडून १०० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणाऱ्या महिला खेळाडूंच्या विशेष क्लबमध्ये आता शेफालीचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. याआधी कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स यांनी हा पल्ला ओलांडला असून शेफाली आता या दिग्गज खेळाडूंच्या रांगेत जाऊन बसली आहे.
हरियाणाच्या रोहतकची कन्या असलेल्या शेफालीने २०१९ मध्ये अवघ्या १५ वर्षे २३९ दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. सुरुवातीपासूनच आपल्या निडर आणि आक्रमक शैलीमुळे तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०१९ च्या महिला टी-२० चॅलेंजमध्ये मिताली राजच्या नेतृत्वाखालील 'व्हेलॉसिटी' संघाकडून खेळताना तिने दिग्गज गोलंदाजांची पिसं काढली होती. तेव्हापासून शेफालीने मागे वळून पाहिले नाही.
शेफालीची बॅट केवळ टी-२० मध्येच तळपते असे नाही, तर तिने कसोटी क्रिकेटमध्येही आपली ताकद दाखवून दिली आहे. २०२४ मध्ये चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना तिने शानदार शतक झळकावले होते. हे महिला कसोटी इतिहासातील त्यावेळचे सर्वात वेगवान शतक ठरले होते.
मोठ्या सामन्यांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची शेफालीची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. गेल्या वर्षी भारताच्या महिला विश्वचषक विजयात तिची भूमिका महत्त्वाची होती. विशेषतः दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात तिने ८७ धावांची खेळी करून आणि महत्त्वपूर्ण बळी घेऊन संघाच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. प्रत्येक फॉरमॅटमध्ये स्वतःला सातत्याने सिद्ध करणारी शेफाली वर्मा भारतीय क्रिकेटमधील एक नवा अध्याय लिहीत आहे.