Jasprit Bumrah
काही वर्षांपूर्वी जसप्रीत बुमराहच्‍या शेजारी राहणार्‍या ज्‍येष्‍ठ पत्रकार दीपल त्रिवेदी यांनी त्‍याच्‍याबद्दल भावनिक पोस्‍ट शेअर केली आहे.   Twitter
स्पोर्ट्स

"प्लास्टिकच्‍या चेंडूने खेळणार मुलगा..." : बुमराहच्‍या शेजारी त्रिवेदींची प्रेरणादायी पोस्‍ट

पुढारी वृत्तसेवा

टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर रोमहर्षक विजय मिळवत विश्‍वचषकावर आपलं नाव कोरलं. तब्‍बल ११ वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्‍काळ संपवला. . यंदाच्‍या टी-20 विश्‍वचषक स्‍पर्धेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची कामगिरी लक्षवेधी ठरली. अंतिम सामन्‍यात मोक्‍याची क्षणी त्‍याने केलेल्‍या भेदक गोलंदाजीमुळे भारत विजयाच्‍या समीप पोहचला. अखेर सात धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने तब्‍बल १७ वर्षानंतर टी-20 विश्‍वचषक आपल्‍या नावावर केला. या कामगिरीनिमित्त देशभरातून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काही वर्षांपूर्वी जसप्रीत बुमराह यांच्‍या शेजारी राहणार्‍या ज्‍येष्‍ठ पत्रकार दीपल त्रिवेदी यांनी त्‍याच्‍याबद्दल एक भावनिक पोस्‍ट शेअर केली आहे. या दीर्घ पोस्‍टच्‍या माध्‍यमातून त्‍यांनी जसप्रीत बुमराहची संघर्षकथा मांडली आहे.

दीपल यांनी शेअर केली जसप्रीत बुमराहच्‍या जन्‍माची गोष्‍ट

जसप्रीत बुमराहच्‍या जन्‍माची काहाणी सांगताना दीपल यांनी लिहिलं आहे की, "डिसेंबर १९९३ मधील एक दिवस. तेव्‍हा माझा महिन्‍याचा पगार हा ८०० रुपयांपेक्षा कमी होता. माझ्‍या मैत्रीण आणि शेजारी माझी मैत्रीण दलजीत हिने मला सुट्टी घेण्यास भाग पाडले. त्‍यावेळी माझं वय २२ ते२३ वर्ष असावे. तो दिवस मी अहमदाबादमधील पालडी भागातील हॉस्पिटलमध्ये घालवला. माझी मैत्रीण दलजीतचा नवरा जसबीर काही मिनिटांसाठी हॉस्‍पिटलमधून बाहेर गेला. तेव्‍हा नर्स त्‍याच्‍या नावाने ओरड मुलगा झाल्‍याचे सांगितले. मी माझ्या थरथरत्या हातात नवजात बाळाला हातात घेतले. नवजात बाळाला स्पर्श करण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. मला फक्त एवढंच आठवतं की, ते बाळ अशक्‍त होते. तो हसायचा प्रयत्न करत होता; पण तो हसला नाही."

माझे सख्‍खे शेजारी..

दीपल यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे की, आमची गोष्‍ट बॉलीवूडच्‍या चित्रपटापेक्षा कमी नाही. जसप्रीतच्‍या जन्‍मानंतर मी लवकरच राजकीय रिपोर्टर बनले. आम्‍ही सख्‍खे शेजारी होतो. त्‍यावेळी माझ्याकडे फोन, फ्रीज नव्हता! मी माझी मैत्रीण दलजीत (जसप्रीत बुमराहची आई) आम्ही एक भिंत सामायिक केली. तिचे घर माझे आश्रयस्थान होते.

जसबीर सिंग यांच्‍या निधानंतर त्‍यांचे आयुष्‍य बदलले...

बुमराहचे वडील जसबीर सिंग यांचे निधन झाले. यानंतर त्या दोघांचेही आयुष्य बदलले.आम्ही हताश होतो. महिनाभर मी मुलांना सांभाळले. तो त्याच्या स्वस्त प्लास्टिकच्या बॉलने खेळू लागला. या मुलाचा संघर्ष मोठा होता. अमूल डेअरीचे पाकीट किंवा दुधाचे पाकीट त्‍याला क्वचितच परवडत असे. जसजसा तो मोठा होत गेला तसतसे आम्ही सर्वजण संघर्ष करण्यात व्यस्त होतो. त्याची आई दिवसाचे किमान 16-18 तास काम करत असे,” असेही दीपल यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

मला आठवतं की, मला एकदा पगावरवाढ मिळाली. आम्‍ही एका अलिशान दुकानात खरेदीसाठी गेलो. मला कुर्ता विकत घेयचा होता. दलजीत आणि जसप्रीत माझ्‍याबरोबर होते. जसप्रीत तेव्‍हा आठ वर्षांचा असावा. आम्‍ही दुकानात गेलो तेव्‍हा तो आईच्‍या दुपट्ट्याच्या मागे लपला. त्याला एक जॅकेट आवडले. त्‍यावेळी मी कुर्ता घेण्‍याऐवजी जॅकेट घेतलं. मी दिवाळी, ख्रिसमस आणि माझा वाढदिवस नवीन कुर्त्याशिवाय घालवला; पण मी त्‍याला भेट दिलेल्‍या जॅकेटने मला राजदीप राणावत किंवा मनीष मल्होत्रा ​​किंवा अन्‍य कोणीचाही कुर्ता परिधान केल्या पेक्षाही अधिक समाधान दिले, अशी आठवणही दीपल आपल्‍या पोस्‍टमध्‍ये शेअर केली आहे.

आयुष्यात कोणीही आशा गमावू नये....

लहानपणी जसप्रीत बुमराह हा एक लाजाळू मुलगा होता. आज तो दंतकथा झाला आहे. प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. त्याच्याकडून शिकले पाहिजे. कारण आजही त्याची नम्रता कायम आहे. कधीही हार मानू नका, यावर भर देण्यासाठी मी ही दीर्घ पोस्ट लिहिली आहे. मी खूप भाग्यवान आहे की जसप्रीत जन्‍माला आला तेव्‍हा पहिल्यांदा मी माझ्या हातात उचलून घेतले हाेते. सप्रीत बुमराहच्‍या संघर्षाचा विचार करा. त्याची धडपड आणि देवाने त्याला कशी मदत केली. देव आपल्या सर्वांची मदत करेल; परंतु प्रथम आपण स्वतःला मदत केली पाहिजे. मी ही वैयक्तिक पोस्ट लिहित नाही, आयुष्यात कोणीही आशा गमावू नये अशी माझी इच्छा आहे." असेही त्‍यांनी पाेस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे.

ज्‍येष्‍ठ पत्रकार दीपल त्रिवेदी यांनी बुमराह बाबत लिहिली पोस्‍ट तुफान व्‍हायरल झाली आहे. या पोस्‍टमध्‍ये बुमराह आणि दीपल यांच्‍या कुटुंबीयांचा छायाचित्रे देखील आहेत.

SCROLL FOR NEXT