नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नुकत्याच झालेल्या हाँगकाँग ओपनमध्ये अंतिम फेरी गाठल्यामुळे आत्मविश्वास वाढलेला लक्ष्य सेन आणि सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही जेतेपदापासून सातत्याने वंचित राहत आलेले सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी आजपासून (मंगळवार, दि. 16) सुरू होणार्या चीन मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत हंगामातील पहिल्या विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहेत. दुखापती आणि खराब फॉर्ममुळे दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेल्या लक्ष्यची पहिली लढत फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपोव्हसोबत होणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवणार्या 24 वर्षीय लक्ष्यला या हंगामात अनेक स्पर्धांमधून लवकरच गाशा गुंडाळावा लागला. पण, यापूर्वी संपन्न झालेल्या हाँगकाँग ओपनमध्ये त्याने अंतिम फेरी गाठून आपला फॉर्म परत मिळवला. आता त्यापुढेही जात जेतेपद काबीज करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे त्याने म्हटले आहे.
आठव्या मानांकित सात्त्विक आणि चिराग यांनी या हंगामात सहा स्पर्धांमध्ये सेमीफायनल गाठली, याशिवाय, दुसरे जागतिक विजेतेपद कांस्यपदक, तसेच गेल्या आठवड्यात हाँगकाँग येथे उपविजेतेपद पटकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेचे विजेते असलेले सात्त्विक-चिराग 2025 मधील पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असून, त्यांची पहिली लढत मलेशियाच्या जुनैदी आरिफ आणि रॉय किंग याप यांच्याशी होईल.
गेल्या आठवड्यात जपानच्या कोडाई नाराओकाला धक्का देणारा युवा खेळाडू आयुष शेट्टीसमोर सहाव्या मानांकित चिनी तैपेईच्या चोऊ टीएन चेनचे आव्हान असेल. आयुषने गेल्या जूनमध्ये यूएस ओपन सुपर 300 मध्ये आपले पहिले बीडब्ल्यूएफ विजेतेपद मिळवताना चेनला हरवले होते. महिला एकेरीत, दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू डेन्मार्कच्या ज्युली डोवॉल याकोबसेनविरुद्ध आपला सर्वोत्तम खेळ साकारण्यासाठी प्रयत्नशील असेल.
महिला दुहेरीमध्ये पांडा भगिनी - ऋतुपर्णा आणि स्वेतापर्णा यांचा सामना मलेशियाच्या ओंग शिन यी आणि कारमेन टिंगविरुद्ध होईल. मिश्र दुहेरीमध्ये रोहन कपूर आणि रुथविका शिवानी गाडे जपानच्या युइची शिमोगामी आणि सायाका होबाराविरुद्ध खेळतील, तर जागतिक विजेतेपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेले ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांचा सामना दुसर्या मानांकित चीनच्या फेंग यान झे आणि हुआंग डोंग पिंग यांच्याशी होईल.