स्पोर्ट्स

Sunil Gavaskar : सॅमसनच्या खेळीने गावस्कर भारावले; म्हणाले, ‘प्रत्येकाला तो यशस्वी व्हावा असेच वाटते’

T20 World Cup 2026 Sanju Samson innings

रणजित गायकवाड

कोलकाता : टी-२० विश्वचषकातील वेस्ट इंडिजविरुद्धच्या निर्णायक सामन्यात संजू सॅमसनने खेळलेल्या नाबाद ९७ धावांच्या खेळीचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी भरभरून कौतुक केले आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर बोलताना गावस्कर यांनी सॅमसनच्या या खेळीचे भावनिक महत्त्व अधोरेखित केले.

'स्टार स्पोर्ट्स'शी संवाद साधताना गावस्कर म्हणाले की, सॅमसनला अखेर ‘त्याच्या कष्टाचे फळ’ मिळाले आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या या 'करो या मरो' सामन्यात सॅमसनच्या वादळी आणि तिसतक्याच संयमी खेळीमुळे भारताने वेस्ट इंडिजवर विजय मिळवून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता मुंबईत इंग्लंडविरुद्ध भारताचा सामना होणार आहे.

सॅमसनला या सामन्यात 'सामनावीर' पुरस्काराने गौरवण्यात आले. यावर भाष्य करताना गावस्कर म्हणाले की, ‘ही नाबाद ९७ धावांची खेळी केवळ आकड्यांपुरती मर्यादित नाही. विश्वचषकापूर्वी सॅमसन ज्या खराब फॉर्ममधून जात होता, त्या पार्श्वभूमीवर ही खेळी अत्यंत महत्त्वाची आहे.’

‘या नाबाद ९७ धावांच्या खेळीने केवळ सॅमसनच्या खांद्यावरील ओझे हलके केले नाही, तर त्याच्या कौशल्याची जाण असणाऱ्या प्रत्येकालाच दिलासा दिला आहे. संजूच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले आणि तो एक उत्तम व्यक्ती असल्याने आम्हालाही त्या अपयशाचे दुःख झाले. जगातील प्रत्येक क्रिकेट चाहत्याला संजूने चांगली कामगिरी करावी असेच वाटत असते,’ असे भावूक उद्गार गावस्कर यांनी काढले.

ते पुढे म्हणाले की, ‘या प्रामाणिक क्रिकेटपटूला अखेर अपेक्षित यश मिळाले आहे, याचा भारतीय क्रिकेट चाहत्यांना मनापासून आनंद होईल.’

भारताच्या यशस्वी पाठलागाचे 'गावस्कर सूत्र'

संजूच्या खेळीचे कौतुक करण्यासोबतच गावस्कर यांनी भारतीय संघाने या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग नेमका कसा केला, याचे तांत्रिक विश्लेषणही मांडले. त्यांच्या मते, 'डॉट बॉल्स' कमी करणे हा या विजयाचा मुख्य मंत्र ठरला.

गावस्कर म्हणाले, ‘मैदानावर एक फलंदाज स्थिरावलेला असणे नेहमीच फायदेशीर ठरते. दुसरा फलंदाज एकेरी धावा घेऊन स्ट्राईक रोटेट करू शकतो, ज्यामुळे डॉट बॉल्सचे प्रमाण कमी होते. टी-२० क्रिकेटमध्ये डॉट बॉल्सची संख्या किमान ठेवणे हेच यशाचे गमक आहे.’

भारतीय संघाने ही रणनीती आता आत्मसात केली असल्याचा दावा गावस्कर यांनी केला. ‘कमीतकमी डॉट बॉल्स खेळणाऱ्या जागतिक संघांच्या यादीत भारत आता आघाडीवर आहे. मी असे म्हणणार नाही की भारत यात सर्वोत्तम आहे, पण ते नक्कीच वरच्या स्थानी आहेत. अर्धी लढाई तर तिथेच जिंकली जाते,’ असेही त्यांनी नमूद केले.

१९० ते २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने कशा प्रकारे नियोजन केले, हे सांगताना ते म्हणाले, ‘जर तुम्ही १२० चेंडूंपैकी ८० ते ८५ चेंडूंवर धावा काढल्या, तर २०० धावांचे लक्ष्य गाठणे सहज शक्य होते. वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने नेमके हेच केले.’

'स्वप्नवत कामगिरी'

निर्णायक सामन्यात सामनावीर ठरणे हे कोणत्याही क्रिकेटपटूसाठी 'स्वप्नपूर्ती' असते, असे सांगताना गावस्कर यांनी विजयानंतर सॅमसनच्या चेहऱ्यावरील भावांकडे लक्ष वेधले. ‘विजयी धाव काढल्यानंतर संजूच्या चेहऱ्यावर जे भाव होते, त्यातून सर्व काही स्पष्ट होत होते,’ असे गावस्कर म्हणाले. सॅमसनचे शतक केवळ तीन धावांनी हुकले असले, तरी त्याच्या या नाबाद ९७ धावांनी भारतीय संघाचा आणि चाहत्यांचा विश्वास पुन्हा सार्थ ठरवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT