अहमदाबाद : न्यूझीलंडविरुद्धच्या महाअंतिम सामन्यात संजू सॅमसनने आपल्या फलंदाजीची सुरुवात एका दिमाखदार षटकाराने केली आणि या एका फटक्यासह त्याने भारतीय क्रिकेटमधील एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून १००० धावांचा टप्पा ओलांडणारा तो भारताचा केवळ दुसरा खेळाडू ठरला असून, त्याने दिग्गज कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
भारताचा सध्याचा सर्वात फॉर्मात असलेला यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनने मॅट हेन्रीच्या चेंडूवर लाँग-ऑनच्या दिशेने उत्तुंग षटकार खेचत आपले खाते उघडले. या षटकारासह संजूने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये यष्टिरक्षक म्हणून १००० धावा पूर्ण केल्या. भारतासाठी हा टप्पा गाठणारा तो धोनीनंतरचा दुसराच खेळाडू आहे. यासोबतच चालू विश्वचषकात संजूच्या नावावर आता १७ षटकार झाले असून, एकाच स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज म्हणून त्याने रोहित शर्मालाही मागे टाकले आहे.
संजू सॅमसन : ४५ सामने : ३८ डाव : १०००* धावा
एम.एस. धोनी : ९८ सामने : ८५ डाव : १६१७ धावा
ऋषभ पंत : ६४ सामने : ५४ : ९९६ धावा :
इशान किशन : २१ सामने : २१ डाव : ५४५ धावा
के.एल. राहुल : ८ सामने : ८ डाव : ३०५ धावा
अंतिम सामन्यापूर्वी संजूने ४ सामन्यांत २३२ धावा केल्या होत्या. या महत्त्वाच्या सामन्यातही त्याने आक्रमक सुरुवात केली आणि वादळी अर्धशतक फटकावले. जर अंतिम सामन्यात संजूने मोठी खेळी साकारली, तर तो 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' (स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू) ठरू शकतो. आयसीसीने या पुरस्कारासाठी जाहीर केलेल्या ८ नामांकनांमध्ये संजूचा समावेश आहे. या स्पर्धेत त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ९७ आणि इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात ८९ धावांची खेळी करून 'सामनावीर' पुरस्कारही पटकावला होता.