चेन्नई : झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर-८ लढतीत भारतीय यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने मैदानात पाऊल ठेवताच इतिहासाला गवसणी घातली आहे. सामन्याच्या पहिल्याच षटकात षटकार ठोकून संजूने एका खास विक्रमाची नोंद केली असून, टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध संजू सॅमसनला भारतीय अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले आणि सलामीवीर म्हणून बढतीही दिली गेली. संजूने या संधीचे सोने करत डावाच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार खेचून आपले खाते उघडले. संजूने १५ चेंडूंत २४ धावांची छोटी पण वेगवान खेळी केली, ज्यामध्ये १ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. १६०.०० च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या संजूने या खेळीत रोहित शर्मा आणि इशान किशन यांसारख्या दिग्गजांचे विक्रम मोडीत काढले.
टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या षटकात दोन वेळा षटकार ठोकणारा संजू सॅमसन हा आता भारताचा एकमेव फलंदाज ठरला आहे. यापूर्वी युसूफ पठाण, मुरली विजय, रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी विश्वचषकाच्या पहिल्या षटकात प्रत्येकी एक षटकार लगावला होता. संजूने या स्पर्धेत नामिबियाविरुद्ध पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता आणि आता झिम्बाब्वेविरुद्ध रिचर्ड नगारवाच्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकून त्याने आपला दुसरा 'ओपनिंग ओव्हर' षटकार नोंदवला.
२००७ : युसूफ पठाण : वि. पाकिस्तान (मोहम्मद आसिफ) : पहिले षटक ४ था चेंडू
२०१० : मुरली विजय : वि. अफगाणिस्तान (अहमदझाई) : पहिले षटक ५ वा चेंडू
२०२४ : रोहित शर्मा वि. पाकिस्तान (शाहीन आफ्रिदी) : पहिले षटक ३ रा चेंडू
२०२६ : इशान किशन : वि. अमेरिका (सौरभ नेत्रावळकर) : पहिले षटक ५ वा चेंडू
२०२६ : संजू सॅमसन : वि. नामिबिया (आर. ट्रम्पेलमन) : पहिले षटक ६ वा चेंडू
२०२६ : संजू सॅमसन : वि. झिम्बाब्वे (रिचर्ड नगारवा) : पहिले षटक २ रा चेंडू