Sanju Samson MS Dhoni Video pudhari
स्पोर्ट्स

Sanju Samson MS Dhoni Video: नशीब मला इथं घेऊन आलंय अन्... जेव्हा CSK ची लेगसी अन् भविष्याची होते भेट! खास व्हिडिओ

Anirudha Sankpal

Sanju Samson MS Dhoni Video: चेन्नई सुपर किंग्जने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सीएसकेचा थला एमएस धोनी आणि सीएसकेचं भविष्य संजू सॅमसन एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. या व्हिडिओत सॅमसन आणि धोनी चर्चा करताना बॅकग्राऊंडला संजूचा आवाज ऐकू येत आहे.

याबाबत बोलताना संजू म्हणतो, 'आम्ही आयपीएलमध्ये भेटत होतो. मात्र त्यावेळी मैदानात खूप गर्दी असायची. आजूबाजूला ५ - १० लोकं असायचीच. मी त्यावेळी विचार करायचो की हे पुरेसं नाही. मला त्याच्यासोबत एकट्यानं बसायचं आहे. माझी तशी इच्छा होती.'

संजू पुढे म्हणाला, 'नशीब मला इथं घेऊन आलं. मी आता त्याच्यासोबत खेळतोय. ड्रेसिंग रूम शेअर करतोय. मी दोन महिन्यापूर्वी जेवढा उत्साही होतो तेवढाच आता देखील आहे. मी नक्कीच त्याच्याशी भेटायला आणि बोलायला खूप उत्सुक होतो. त्याच्यासोबत बसणे नाष्टा करणे, सराव करणे, सामने खेळणे याचा फक्त विचार करून खूप आनंद होत आहे.'

संजू सॅमसन आयपीएलचा आपला नवा अध्याय सुरू करत आहे. अनेक वर्षे जवळपास एक दशक तो राजस्थान रॉयल्सचा चेहरा राहिला आहे. त्यानं ११ हंगामात राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. आता तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. आयपीएल २०२६ हा त्याचा सीएसकेकडूनचा पहिला हंगाम असणार आहे. सीएसकेने संजूसाठी सॅम करन आणि रविंद्र जडेजा यांना ट्रेड ऑफ केलं होतं.

संजू सॅमसनने नुकतेच झालेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये भारताकडून दमदार कामगिरी केली आहे. त्याने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. आता तो आयपीएलमध्ये चेन्नईकडून आपला पहिला हंगाम खेळणार आहे.

वर्ल्डकपपूर्वी त्याचा फॉर्म फारसा चांगला नव्हता. त्यामुळं त्याला पहिले काही सामने बेंचवर बसावं लागलं. मात्र तो सुपर ८ फेरीत त्याला खेळण्याची संधी मिळाली. त्यानं या संधीचं सोनं केलं. सलग तीन मोठी अर्धशतके ठोकली. वेस्ट इंडीज विरूद्ध नाबाद ९७ धावा, सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरूद्ध ८९ धावांची खेळी आणि फायनलमध्ये न्यूझीलंडविरूद्ध ८९ धावा करून त्याने भारताच्या वर्ल्डकप विजयात मोलाचा वाटा उचलला.

संजू सॅमसनने फक्त ५ डावात ३२१ धावा ठोकल्या. त्याने एका टी २० वर्ल्डपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादी विराट कोहलीच्या ३१९ धावांच्या विक्रमाला मागे टाकले. तसेच त्याने एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील सेट केला. त्यानं टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये तब्बल २४ षटकार मारले.

आता संजू सॅमसन सीएसकेकडून आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. तो आता धोनीच्या खांद्याला खांदा लावून खेळणार आहे. कधी काळी हे एक फक्त स्वप्न वाटत असणारी गोष्ट आता सत्यात उतरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT