संजू सॅमसन आणि नितीश कुमार रेड्डी Twitter
स्पोर्ट्स

टी-20 क्रमवारीत संजू सॅमसनचा धमाका! नितीश कुमार रेड्डीची विक्रमी 499 स्थानांची झेप

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत-बांगलादेश टी-20 मालिकेनंतर आयसीसीने नवीन क्रमवारी जाहीर केली आहे. या मालिकेत भारताच्या संजू सॅमसनची ताकद पाहायला मिळाली. हैदराबाद टी-20 सामन्यात त्याने ज्या प्रकारची खेळी खेळली त्यामुळे सॅमसनला खूप फायदा झाला आहे. याशिवाय नितीश रेड्डीने टी-20 क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे. तर सूर्यकुमार यादव टॉप-5 मध्ये कायम आहे.

सॅमसनने हैदराबाद टी-20 सामन्यात भारतासाठी दुसरे सर्वात वेगवान टी-20 शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. त्याने मैदानात उतरताच गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पुढच्या 13 चेंडूंमध्ये त्याने 50 धावा वसूल केल्या. अशाप्रकारे त्याने केवळ 40 चेंडूत स्फोटक शतक झळकावले. सॅमसनने 47 चेंडूंत 11 चौकार आणि आठ षटकारांसह 111 धावा फटकावल्या.

सॅमसनने 91 स्थानांची झेप

आपल्या शतकी खेळीमुळे संजू सॅमसनने T20 क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. याआधी तो टॉप-100 मध्ये नव्हता पण आता त्याने 91 स्थानांनी झेप घेत थेट 65व्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचे नाव प्रथमच रँकिंगमध्ये दिसले आहे. याशिवाय नितीश रेड्डीने खेळलेल्या झंझावाती खेळीचाही त्याला खूप फायदा झाला आहे. रेड्डी आता 255 स्थानांनी झेप घेत 72 व्या स्थानावर पोहोचला आहे. नितीश रेड्डीने दुसऱ्या टी-20 सामन्यात शानदार 74 धावा केल्या होत्या.

टॉप-5 मध्ये ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा फलंदाज फिल सॉल्ट तिसऱ्या, पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम चौथ्या आणि पाकिस्तानचाच मोहम्मद रिझवान पाचव्या स्थानावर आहे. युवा भारतीय फलंदाज यशस्वी जैस्वाल सहाव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा जोस बटलर सातव्या क्रमांकावर आहे. भारताचा ऋतुराज गायकवाड टॉप-10 मधून 11व्या स्थानावर घसरला आहे.

रेड्डीची अष्टपैलूंच्या क्रमवारीत 499 स्थानांची झेप

नितीश कुमार रेड्डीने आयपीएलच्या गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघासाठी अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळेच त्याला टीम इंडियाकडूनही खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने केले. त्याने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तब्बल 499 स्थानांची विक्रमी झेप घेतली आहे. तो आता थेट 60 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग सध्या 63 आहे.

नितीशने बांगलादेशविरुद्ध अप्रतिम कामगिरी केली

नितीश कुमार बांगलादेश विरुद्धच्या मालिकेतील तीनही सामने खेळला. पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 16 धावा केल्या. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने वादळी अर्धशतक फटकावले तो 74 धावा करून बाद झाला. याच सामन्यात त्याने 23 धावांत 2 बळीही घेतले. तिसऱ्या सामन्यात तो फलंदाजीत काही करू शकला नाही, पण 31 धावांत एक विकेट घेतली. याआधी कोणत्याही खेळाडूने आयसीसी क्रमवारीत अशी स्फोटक एंट्री केलेली नाही. आता भविष्यात नितीश कुमार भारतीय संघासाठी कशी कामगिरी करतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT