दुबई, वृत्तसंस्था : चेन्नई सुपर किंग्जच्या (IPL 2024) पर्समध्ये 11.60 कोटी शिल्लक होते आणि त्यापैकी 8.40 कोटी 'सीएसके'ने समीर रिझवीसाठी मोजले. 20 लाख मूळ किंमत असलेल्या समीरसाठी गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांनी बोली लावली. या दोघांनी बोली एवढी वर नेली की, ती 8 कोटींपर्यंत पोहोचली. या दोघांव्यतिरिक्त अन्य संघांनी फार रस दाखवला नाही. 7.60 कोटींनंतर गुजरातने माघार घेतली आणि दिल्ली कॅपिटल्सची एन्ट्री झाली. परंतु, चेन्नईने माघार न घेता 8.40 कोटींत ही डिल पक्की केली.
20 वर्षीय समीर रिझवी उत्तर प्रदेश टी-20 लीगमध्ये कानपूर सुपरस्टार्स संघातून खेळतो. त्याने या स्पर्धेत 9 डावांत 2 शतकांसह 455 धावा चोपल्या. पंजाब किंग्जसह त्याला 'आयपीएल'मधील तीन फ्रँचायझींनी ट्रायलसाठी बोलावले. उत्तर प्रदेशच्या 23 वर्षांखालील संघासाठीच्या ट्रायलमध्ये त्याला जाता आले नाही.
उजव्या हाताने खेळणारा रैना असे म्हणून ज्याला ओळखले जाते, त्या समीर रिझवीने अलीकडेच देशांतर्गत खेळल्या गेलेल्या 'लिस्ट ए' सामन्यांमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, याआधी देशांतर्गत टी-20 सामन्यांमध्येही त्याने आक्रमक फलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. हा 20 वर्षांचा युवा खेळाडू मधल्या फळीत फलंदाजी करतो आणि वेगाने धावा काढण्यासाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत देशांतर्गत दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने फक्त 17 धावा केल्या आहेत. (IPL 2024)
'लस्ट ए क्रिकेट' कारकिर्दीत त्याने 11 सामन्यांत 29-28 च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 61 धावा आहे. त्याच्या टी-20 मध्ये केवळ 11 सामन्यांमध्ये त्याने 49.16 च्या सरासरीने आणि 134.70 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने 295 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत आणि सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 75 आहे. मधल्या फळीत 'सीएसके'साठी समीर चांगला फलंदाज ठरू शकतो.