ग्लास्गो; वृत्तसंस्था : येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी दुसर्या सत्रात झालेल्या निर्णायक लढतीत भारतीय बॉक्सर्सनी इतिहास रचत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये अरुंधती चौधरी, प्रिया घंसास आणि साक्षी चौधरी यांनी सोनेरी कामगिरी करत भारताच्या खात्यात आणखी तीन सुवर्णपदकांची भर घातली. ऑलिम्पिक पदकविजेत्या लव्हलिना बोरगोहेनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. यासह भारताने राष्ट्रकुल बॉक्सिंगच्या इतिहासातील स्वतःचाच जुना विक्रम मोडीत काढला आहे.
शनिवारचा दिवस भारतीय बॉक्सिंगसाठी सुवर्णक्षण ठरला. या अभूतपूर्व कामगिरीमुळे भारताने नवी दिल्ली २०१०, गोल्ड कोस्ट २०१८ आणि बर्मिंगहॅम २०२२ या स्पर्धांमधील प्रत्येकी ३ सुवर्णपदकांचा स्वतःचाच जुना विक्रम मागे टाकला आहे.अरुंधती चौधरीने ५७ किलो गटात इंग्लंडच्या चँटेल रीडवर ५-० अशी एकतर्फी आणि दमदार मात करत भारताला दिवसातील पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले. चँटेल ही २०२५ च्या जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती आहे.
महिलांच्या ६० किलो वजनी गटात प्रियाने कॅनडाच्या मारी-बथौल अल-अहमदियाचा ४-१ अशा स्प्लिट डिसिजन (विभक्त निर्णय) फरकाने पराभव केला. हा सामना अत्यंत चुरशीचा ठरला. साक्षी चौधरीने ५१ किलो वजनी गटात इंग्लंडच्या रुबी व्हाईटचा ५-० असा धुव्वा उडवत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.