Virat Kohli  Pudhari
स्पोर्ट्स

Sunil Gavaskar: सचिन तेंडुलकर की विराट कोहली? सुनील गावस्कर यांनी सांगितलं वनडे क्रिकेटचा खरा किंग कोण?

Virat Kohli Greatest ODI Player: विराट कोहलीने 52 वनडे शतकं ठोकताच सुनील गावसकरांनी त्याला ‘वनडे क्रिकेटमधला सर्वात महान खेळाडू’ घोषित केलं. सचिन तेंडुलकरचाही विक्रम मोडल्याने कोहलीची उंची अधिक वाढली आहे.

Rahul Shelke

Sunil Gavaskar Declares Virat Kohli as the Greatest ODI Player Ever:

भारतीय क्रिकेटमधील महान फलंदाज सुनील गावसकर यांनी केलेलं वक्तव्य क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडू जर कोण असेल, तर तो विराट कोहली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीने 120 चेंडूत 135 धावांची जबरदस्त खेळी खेळत 52वे शतक झळकावले. या शतकासह भारताने 8 बाद 349 धावा केल्या होत्या.

गावसकर यांनी ‘जिओस्टार’शी बोलताना सांगितलं की, “यात कोणतेही दुमत असू शकत नाही. विराट कोहली हा वनडे क्रिकेटमधील सर्वात महान खेळाडू आहे. त्याच्यासोबत खेळलेले किंवा त्याच्याविरुद्ध खेळलेले क्रिकेटपटूही हेच सांगतात.” ते पुढे म्हणाले, “कोहलीने 52 शतके केली आहेत… ही शतके दाखवतात की तो कुठल्या उंचीवर पोहोचला आहे.”

पोंटिंगचे काय मत आहे?

गावसकर म्हणाले की ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पोंटिंग यांनीही मान्य केलं आहे की त्यांनी पाहिलेल्या सर्वात उत्तम वनडे खेळाडूंपैकी विराट कोहली सर्वोत्तम आहे. गावसकर म्हणाले, “एखादा ऑस्ट्रेलियन कर्णधार तुमची प्रशंसा करत असेल, तर तो महान खेळाडू आहे. त्यामुळे यात वादाची जागाच नाही.”

सचिनचा विक्रम मोडून विराट अव्वल

सचिन तेंडुलकरने वनडेत 51 शतके करून दशकानुदशके हा विक्रम कायम ठेवला होता. कोहलीने हा भव्य विक्रम मोडला. गावसकर म्हणाले, “सचिनला मागे टाकल्यावर तुम्ही कुठे उभे आहात, हे जगाला कळते.”

दक्षिण आफ्रिका कोचच्या वक्तव्यावर गावसकरांचा टोला

दक्षिण आफ्रिकाचे कोच शुक्री कॉनराड यांनी भारताला “गुडघ्यावर आणू” याबद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना गावसकर म्हणाले की, हे विधान चुकीचे होते. गावसकर म्हणाले, “जोशात केलेले वक्तव्य असेल. पण भारत–दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट संबंध दशकानुदशके चांगले आहेत.” गावसकरांनी सांगितलं की माफी मागण्याची आवश्यकता नाही, पण “चूक मान्य करून स्पष्टीकरण दिले तर ते सर्वांनाच आवडेल.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT