प्रातिनिधिक छायाचित्र. Pudhri Photo.
स्पोर्ट्स

Sachin Tendulkar| सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली की त्याला भाग पाडले? ‘त्या’ प्रश्नाबाबत संदीप पाटील यांचा गौप्यस्फोट

Sachin Tendulkar retirement| आम्ही सचिनला कधीही संघातून काढले नाही; पण चर्चा नक्कीच केली होती

पुढारी वृत्तसेवा

Sachin Tendulkar retirement

मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'देव' अशी चाहत्‍यांची भावना असणारा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबत एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्‍या (बीसीसीआय) निवड समितीने सचिनला त्याच्या पर्यायाचा शोध सुरू असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच मास्टर ब्लास्टरने निवृत्तीची घोषणा केली होती, अशी माहिती माजी मुख्य निवडकर्ते संदीप पाटील यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना दिली.

२०१२ मध्‍ये सचिनच्‍या फॉर्ममध्‍ये झाली होती घसरण

२०११ चा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण केल्यानंतर सचिनच्या फॉर्ममध्ये घसरण झाली होती. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा ०-४ असा पराभव झाला होता. सचिनला १०० व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी मोठा संघर्ष करावा लागत होता. घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्‍याने १८.६ च्या सरासरीने केवळ ११२ धावा केल्या होत्या. सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांसारख्या दिग्गज सहकाऱ्यांनी आधीच निवृत्ती घेतली होती. त्यामुळे सचिनवरही निवृत्तीचा दबाव होता.

संदीप पाटील आणि सचिनची ती 'खास' भेट

संदीप पाटील यांनी सांगितले की, "२०१२ च्या नागपूर कसोटीच्या शेवटच्या दिवशी मी आणि सहकारी निवडकर्ते राजेंद्रसिंग हंस यांनी सचिनची भेट घेतली. मी त्याला विचारले, तुझ्‍या आगामी वाटचालीबद्दल काय ठरवले आहे. निवड समितीला वाटत होते की, त्याचे योगदान संघाला अपेक्षित यश मिळवून देण्यात कमी पडत आहे. आम्ही त्याला कधीही संघातून काढले नाही, पण आम्ही चर्चा नक्कीच केली होती."

सचिनला बसला होता धक्का

पाटील यांनी सचिनला सांगितले की, निवड समिती आता त्याच्या पर्यायाचा विचार करत आहे, तेव्हा सचिनला मोठा धक्का बसला. सचिनने आश्चर्याने विचारले होते की, "का? तुम्ही गंभीर आहात का?". त्यावर पाटील यांनी होकारार्थी उत्तर दिले. सुरुवातीला "मला खेळ सुरू ठेवायचा आहे," असे सांगणाऱ्या सचिनने अवघ्या एका आठवड्यात पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर एका वर्षाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेनंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा निरोप दिला.

सचिनला निवृत्तीचा निरोप देणे हा एक कठीण निर्णय

संदीप पाटील यांनी सांगितले की, "सचिनला निवृत्तीचा निरोप देणे हा एक कठीण निर्णय होता, पण त्यानंतर अजिंक्य रहाणेसारखा खेळाडू संघात आला." सचिनने आपल्या २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत ३४,००० पेक्षा जास्त धावा केल्या आणि २०० कसोटी सामने खेळणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT