India vs Japan T20 Sachin Tendulkar Praise Japan Cricket Special Fan Guides
सानो : जपानमध्ये हळूहळू मूळ धरू पाहणाऱ्या क्रिकेटच्या प्रसाराने आणि तेथील क्रीडा रसिकांच्या उत्साहाने क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचे लक्ष वेधून घेतले आहे. सानो येथे भारत आणि जपान यांच्यात नुकताच पार पडलेला टी-२० सामना केवळ खेळाच्या दृष्टीनेच नव्हे, तर क्रिकेट संस्कृतीच्या नव्या सुरुवातीमुळेही संस्मरणीय ठरला. या पार्श्वभूमीवर मास्टर ब्लास्टरने जपानमधील क्रिकेटच्या वाढत्या प्रभावाचे आणि प्रेक्षकांना खेळ समजावून सांगण्यासाठी राबवलेल्या साध्या तरीही प्रभावी कल्पकतेचे भरभरून कौतुक केले आहे.
या सामन्यादरम्यान मैदानावर दाखल होणाऱ्या स्थानिक प्रेक्षकांना प्रवेशद्वारावरच क्रिकेटचे मूलभूत नियम समजावणारी सचित्र माहितीपुस्तिका देण्यात येत होती. जपानी क्रीडाप्रेमींसाठी हा खेळ तुलनेने नवीन असल्याने, त्यांना मैदानातील घडामोडी आणि खेळाचे नियम सहज कळावेत या उद्देशाने ही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. आयोजकांच्या या उपक्रमाने सचिनचे मन जिंकले.
‘एक्स’वर आपल्या भावना व्यक्त करताना सचिनने लिहिले, ‘क्रिकेट जेव्हा जगभरात आपली नवी घरे शोधते, तेव्हा ते दृश्य मनाला अत्यंत आनंद देते. भारत विरुद्ध जपान सामना पाहणे हा स्वतःच एक विलक्षण अनुभव होता; पण मला सर्वात जास्त आनंद याचे कौतुक करताना झाला की, प्रेक्षकांना खेळाचे नियम नीट कळावेत म्हणून प्रवेशद्वारावरच माहितीपुस्तिका वाटल्या जात होत्या.’
पावसामुळे प्रत्येकी पाच-पाच षटकांच्या झालेल्या या सामन्यात जपानच्या संघाने मातब्बर भारताला अखेरच्या चेंडूपर्यंत कडवी झुंज दिली. भारताने हा सामना अवघ्या दोन धावांनी निसटता जिंकला असला, तरी जपानच्या शिस्तबद्ध कामगिरीने सर्वांची मने जिंकली.
या झुंजार वृत्तीचे कौतुक करताना सचिन म्हणाला, ‘आपण सर्वांनी कधी ना कधी आपल्या आयुष्यातील पहिला सामना खेळलेला असतो; आता जपानच्या खेळाडूंना हा अनुभव घेताना पाहणे खरोखरच सुखद आहे. हे आव्हान धाडसाने स्वीकारल्याबद्दल आणि शेवटपर्यंत लढा दिल्याबद्दल जपान संघाचे मनापासून अभिनंदन.’ जपानच्या या पावलांमुळे आशिया खंडात क्रिकेटचा विस्तार अधिक वेगाने होईल, असा विश्वासही सचिनच्या प्रतिक्रियेतून व्यक्त होतो.