सचिन खिलारी.  Twitter
स्पोर्ट्स

संकटाला भिडला आणि जिंकला..! माणदेशी सुपुत्र सचिन खिलारीने गाजवलं पॅरालिम्पिक

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा: Paris Paralympics 2024 (Sachin Sarjerao Khilari) : ताे अवघ्‍या ९ वर्षांचा हाेता. सायकल चालवताना पडला. त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला. मात्र काही दिवसात गँगरीन पसरू लागले. या जीवघेण्‍या संकटातून ताे बचावला;पण त्‍याच्‍या हाताच्‍या हालचालींवर कायमस्‍वरुपी मर्यादा आल्‍या. बालपणातच हा मोठा अघात त्‍याने माेठ्या धैर्याने पचवला. लहानपणापासून खेळाची कमालीची आवड होतीच. पण आता आपल्‍या शारीरिक मर्यादेचे भांडवल न करता त्‍याने थेट माेठे मैदान गाजवण्‍याचा निर्धार केला. अथक परिश्रम आणि स्‍वप्‍नपूर्तीचा निरंतर ध्‍यासातून सचिन सर्जेराव खिलारी नावाचा खेळाडू घडला. आज त्‍याने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात रौप्य पदक पटकावत देशवासियांची मान गर्वाने उंचावली आहे. त्‍याचबराेबर संकटाचे संधीमध्‍ये कसे रुपांतर करावे, याचा आदर्श देशातील तरुणाई समाेर ठेवला आहे. (Sachin Sarjerao Khilari)

Sachin Sarjerao Khilari  | सायकलवरुन पडल्‍याचे निमित्त झाले...

सचिन खिलारी हा मूळचा सांगली जिल्ह्यातील माणदेशी आटपाडी तालुक्यातील करगणी येथील आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. सर्जेराव खिलारी यांचा तो सुपुत्र आहे. बालपणी सायकलवरून पडल्यानंतर त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला. गँगरीन पसरू लागले. या प्रसंगातून जीव आणि हात वाचला असला तरी त्याच्या हाताच्‍या हालचालींवर मर्यादा आल्या. Sachin Sarjerao Khilari

पुण्यात खिलारीने पहिल्यांदा आझम कॅम्पसमध्ये ॲथलेटिक्स ट्रॅक पाहिला. येथेच त्‍याच्‍या जीवनाला कलाटणी मिळाली. अथलेटिक्समध्येच करिअर करण्‍याचा निश्चय त्‍याने केला. त्यानंतर प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली थाळीफेक व भालाफेक करण्यास सुरुवात केली.

आंतरराष्‍ट्रीय स्‍पर्धा गाजवल्‍या

सचिन खिलारीने २०२३ च्या जागतिक पॅरा अजिंक्यपद स्पर्धेत गोळाफेक मधील F46 गटात १६.२१ मीटर थ्रो सह सुवर्णपदक पटकावले. २०२४च्या जागतिक स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक जिंकले. २०२२ मध्ये आशियाई पॅरा स्पर्धेतील सुवर्णपदकही त्याच्या नावावर आहे.

पॅरालिम्पिकमध्ये रौप्य कामगिरी

सचिन खिलारीने आज १६.३२ मीटर्सच्या आशियाई विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. सचिनचे सुवर्णपदक अवघ्या ०.०६ मीटरने हुकले. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने १६.३८ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक तर कांस्यपदक क्रोएशियाच्या लुका बाकोविच याने मिळवले. या स्पर्धेत भारताचा मोहम्मद यासर आठव्या तर रोहित कुमार नवव्या स्थानी राहिला. (Sachin Sarjerao Khilari)

गोळाफेक अंतिम फेरीत सचिनचा पहिला प्रयत्न 14.72 मीटर, दुसरा 16.32 मीटर, तिसरा 16.15 मीटर, चौथा 16.31 मीटर, पाचवा प्रयत्न 16.03 मीटर आणि सहावा (शेवटचा) प्रयत्न 15.95 मीटर होता. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताचे हे 21 वे पदक ठरले आहे. सचिनने 2023 वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच 2024 च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदकावर मोहोर उमटवले होते. त्‍याच्‍या आजच्‍या कामगिरीमुळे भारताने ४० वर्षांनंतर पॅरालिम्पिकमध्‍ये गोळाफेक क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने या क्रीडा प्रकारात पदक जिंकले होते. सचिनच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताच्या पदकांची संख्या २१ झाली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT