मुंबई : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने इंग्लंडविरुद्धच्या अलीकडील कसोटी मालिकेतील भारताच्या दोन विजयांमध्ये जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. बुमराह न खेळलेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला असला तरी तो फक्त एक योगायोग असल्याचे सचिनने यावेळी नमूद केले.
पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बुमराहने तीन सामने खेळले आणि त्यामध्ये त्याने 14 बळी घेतले. त्यातील दोन वेळा त्याने पाच बळी मिळवले. बुमराहने पहिल्या डावात पाच बळी मिळवत मालिकेला जोरदार सुरुवात दिली. दुसर्या कसोटीत तो खेळला नाही, पण तिसर्या आणि चौथ्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता दाखवली, असे सचिन याप्रसंगी म्हणाला.
जे लोक म्हणतात की, बुमराहशिवाय आपण जिंकलो, माझ्या द़ृष्टीने तो फक्त योगायोग आहे. बुमराहची गुणवत्ता अत्यंत उच्च दर्जाची आहे. तो सातत्याने दर्जेदार मारा करणारा गोलंदाज आहे आणि मी त्याला सर्वोत्तमांमध्ये स्थान देईन, असेही सचिनने पुढे स्पष्ट केले.
दरम्यान, बुमराहच्या अनुपस्थितीत अप्रतिम कामगिरी करत 23 बळी घेणार्या मोहम्मद सिराजचे तसेच, वॉशिंग्टन सुंदरच्या अष्टपैलू कामगिरीचेही सचिनने कौतुक केले. वॉशिंग्टनने दुसर्या कसोटीत बेन स्टोक्सला बाद करत सामना वळवला. पाचव्या कसोटीत त्याने फटकेबाजी करत 53 धावा ठोकल्या, ते विशेष लक्षवेधी होते, याचा त्याने येथे उल्लेख केला.
मँचेस्टर कसोटीत इंग्लंडने ड्रॉसाठी ऑफर दिल्यानंतर भारताने खेळ सुरू ठेवला, यावरही तेंडुलकर यांनी प्रतिक्रिया दिली. वॉशिंग्टन आणि जडेजा शतकाकडे वाटचाल करत होते. सामना जिंकण्याची शक्यता नव्हती, पण मैदानावर राहून त्यांनी प्रयत्न केला हे योग्यच होतं. इंग्लंडच्या गोलंदाजांना विश्रांती मिळावी यासाठी भारताने खेळ थांबवावा, असा विचार चुकीचा आहे, असे ठाम मत सचिनने शेवटी मांडले.