मेलबर्न; वृत्तसंस्था : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आर्यना सबालेंकाने एमिरेटस् एरिनावर आपला दबदबा कायम राखत एलिना स्वितोलिनाचा पराभव केला आणि सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या महिला एकेरीत अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदाच्या या निर्णायक सामन्यात तिच्यासमोर कझाकिस्तानच्या एलिना रिबाकिनाचे आव्हान असेल.
दोन वेळची विजेती असलेल्या सबालेंकाने सामन्याच्या सुरुवातीला खेळातील चढ-उतार आणि चौथ्या गेममध्ये पंचांनी दिलेल्या ‘हिंडरन्स’ (अडथळा) कॉलवर मात करत स्वितोलिनाचा 6-2, 6-3 असा धुव्वा उडवला. दुसरीकडे, विम्बल्डनची माजी विजेती एलिना रिबाकिनाने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा 6-3, 7-6 (9-7) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. 2023 च्या अंतिम फेरीत सबालेंकाकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आता रिबाकिनाकडे असेल. विशेष म्हणजे, या स्पर्धेत खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये दोघांनीही आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही.
सबालेंका आपल्या पाचव्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रयत्नशील असून, तिने सलग 11 सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. तसेच या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 172 ‘विनर्स’ मारण्याचा मानही तिच्याकडेच आहे. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या रिबाकिनाची सर्व्हिस तिचे बलस्थान मानले जाते. तिने आपल्या मागील 20 सामन्यांपैकी केवळ एक सामना गमावला आहे. ‘हार्ड कोर्ट’वरील आकडेवारी पाहता, रिबाकिनाने सबालेंकाविरुद्ध 6-5 अशी निसटती आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षी मॅडिसन कीजविरुद्धच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर, सबालेंका यंदा ती चूक सुधारून विजेतेपद पटकावण्यासाठी महत्त्वाकांक्षी असणार आहे.