स्पोर्ट्स

SA vs ZIM : द. आफ्रिकेची विजयी घोडदौड कायम, झिम्बाब्वेला 5 गडी राखून नमवले; रझाची अष्टपैलू झुंज अपयशी

T20 World Cup 2026 : अष्टपैलू रझाने प्रथम 73 धावांची खेळी केली आणि नंतर भेदक गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडवली.

रणजित गायकवाड

नवी दिल्ली : सुपर-8 फेरीतील शेवटच्या सामन्यात द. आफ्रिकेने झिम्बाब्वेला 5 गडी राखून नमवत यंदाच्या विश्वचषकातील आपली विजयी घोडदौड कायम राखली. कर्णधार सिकंदर रझाने दिलेल्या झुंजार लढतीनंतरही झिम्बाब्वेला येथे पराभवाचा सामना करावा लागला. झिम्बाब्वेने 20 षटकांत 7 बाद 153 धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 17.5 षटकांत 5 बाद 154 धावांसह दमदार विजय संपादन केला.

अष्टपैलू रझाने प्रथम 73 धावांची खेळी केली आणि नंतर भेदक गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडवली. मात्र, ट्रिस्टन स्टब्स आणि जॉर्ज लिंडे यांनी संयमी खेळ करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. यासह दक्षिण आफ्रिकेने आपली अपराजित मोहीम कायम राखली आहे.

सिकंदर रझाचा ‌‘वन मॅन शो‌’

प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. मात्र कर्णधार सिकंदर रझाने 43 चेंडूंत 73 धावांची तुफानी खेळी करत संघाला 153 धावांपर्यंत पोहोचवले. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याचा धैर्याने सामना केला. गोलंदाजीतही त्याने आपल्या पहिल्या दोन षटकांत धोकादायक क्विंटन डी कॉक आणि एडन मार्कराम यांना बाद करून खळबळ माजवून दिली. त्यानंतर आक्रमक खेळणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसला (42) बाद करत त्याने दक्षिण आफ्रिकेची अवस्था 5 बाद 101 अशी केली होती.

स्टब्स-लिंडे जोडीने सावरले

विजयासाठी 53 धावांची गरज असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ दबावाखाली होता. मात्र, ट्रिस्टन स्टब्स (नाबाद 21) आणि जॉर्ज लिंडे (नाबाद 31) यांनी सहाव्या गड्यासाठी महत्त्वाची भागीदारी करत 17.5 षटकांत लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात कागिसो रबाडा आणि मार्को जान्सेन यांसारख्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली होती. तरीही त्यांच्या राखीव फळीने आपली ताकद दाखवून दिली.

सुपर-8 मध्ये झिम्बाब्वेची पाटी कोरी

साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावणाऱ्या झिम्बाब्वेला सुपर-8 मध्ये मात्र एकही विजय मिळवता आला नाही. 3 सामन्यांत 3 पराभवांसह ते स्पर्धेतून बाहेर फेकले. सिकंदर रझा वगळता इतर फलंदाजांना तग धरता आला नाही, हे या पराभवाचे मुख्य कारण ठरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT