स्पोर्ट्स

SA vs NZ Semi Final : १९ वर्षांचा दुष्काळ, ५ पराभव..! द. आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडची पाटी कोरीच, उपांत्य फेरीत इतिहास बदलणार का?

T20 World Cup 2026 : दोन्ही संघांमधील संघर्षाची ही गाथा २००७ च्या पहिल्या विश्वचषकापासून सुरू झाली.

रणजित गायकवाड

T20 World Cup 2026 South Africa vs New Zealand

कोलकाता : टी-२० विश्वचषक २०२६ चा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण लढतीपूर्वी एक थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे, जी कीवी संघाची चिंता वाढवू शकते. टी-२० विश्वचषकाच्या १९ वर्षांच्या इतिहासात न्यूझीलंडला अद्याप एकदाही आफ्रिकन संघावर विजय मिळवता आलेला नाही.

प्रोटियाजचे पारडे जड

या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ काहीसा नशिबाच्या जोरावर आणि सरस 'नेट रनरेट'च्या बळावर अंतिम चारमध्ये पोहोचला आहे. याउलट, द. आफ्रिकेने साखळी फेरीपासून सुपर-८ पर्यंतचे सर्व सातही सामने जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अशा परिस्थितीत द. आफ्रिकेचे पारडे निश्चितच जड मानले जात आहे.

१९ वर्षांची प्रतीक्षा संपणार का?

दोन्ही संघांमधील संघर्षाची ही गाथा २००७ च्या पहिल्या विश्वचषकापासून सुरू झाली. तेव्हापासून २०२६ च्या साखळी फेरीपर्यंत दोन्ही संघ पाच वेळा आमनेसामने आले, परंतु प्रत्येक वेळी दक्षिण आफ्रिकेनेच बाजी मारली. चालू स्पर्धेतही साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा ७ गड्यांनी पराभव केला होता. आता या पराभवाचा बदला घेत १९ वर्षांची ही प्रतीक्षा संपवण्याची संधी न्यूझीलंडकडे असेल.

टी-२० विश्वचषकातील उभय संघांमधील आतापर्यंतचे निकाल

टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात हे द. आफ्रिका आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सहाव्यांदा आमनेसामने येत आहेत. आकडेवारीवर नजर टाकल्यास दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड दिसते, कारण विश्वचषकात न्यूझीलंडला अद्याप एकदाही दक्षिण आफ्रिकेला पराभूत करता आलेले नाही.

  • २००७ : पहिल्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान दक्षिण आफ्रिकेने ६ गड्यांनी विजय मिळवला.

  • २००९ : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात आफ्रिकेने केवळ एका धावेने न्यूझीलंडचा पराभव केला.

  • २०१० : बर्मिंगहॅम येथे झालेल्या सामन्यात प्रोटियाजनी १३ धावांनी बाजी मारली.

  • २०१४ : रोमहर्षक वळणावर न्यूझीलंडला केवळ २ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

  • २०२६ (साखळी फेरी) : चालू विश्वचषकात अहमदाबाद येथे झालेल्या ताज्या लढतीत मार्करमच्या सैन्याने न्यूझीलंडवर ७ गड्यांनी मात केली.

कोलकात्याच्या 'ईडन गार्डन्स'वर महामुकाबला

हा हाय-व्होल्टेज उपांत्य सामना बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ मागील विश्वचषकाचा उपविजेता असून यंदा त्यांनी अजिंक्य राहत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडला साखळी फेरीत आफ्रिकेकडून, तर सुपर-८ मध्ये इंग्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

दोन्ही संघ खालीलप्रमाणे:

दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रियान रिकल्टन, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, कॉर्बिन बॉश, मार्को यान्सेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, क्वेना मफाका, जेसन स्मिथ, जॉर्ज लिंडे.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), टिम सीफर्ट (यष्टीरक्षक), फिन ॲलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, जिमी नीशम, मॅट हेन्री, ईश सोढी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, काइल जेमीसन, डेव्हन कॉनवे, कोल मॅककॉन्की.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT