पुढारी ऑनलाईन डेस्क : केन विल्यमसनचे शतक (नाबाद 133) आणि डेव्हॉन कॉनवेचे अर्धशतक (96) यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने त्रिकोणी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेचा सहा गडी राखून पराभव केला. या विजयासह किवी संघ या मालिकेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला. लाहोरमध्ये झालेल्या सामन्यात, प्रोटीज संघाने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 6 बाद 304 धावा केल्या. प्रत्युत्तरात किवींनी 8 चेंडू शिल्लक ठेवून लक्ष्य गाठले आणि रोमांचक विजय मिळवला.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवी गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. द. आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. 8 व्या षटकात कर्णधार टेम्बा बावुमा (20) बाद झाला. त्याला विल्यम ओ'रोर्कने बाद केले. यानंतर, जेसन स्मिथ फलंदाजीसाठी आला आणि मॅथ्यू ब्रिट्झकेसह डाव सांभाळला. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली.
25 व्या षटकात स्मिथ (41) धावबाद झाल्याने ही भागीदारी तुटली. त्यानंतर काइल व्हेरेन (1) माघारी परतला. 46 व्या षटकात, मॅट हेन्रीने मॅथ्यू ब्रिट्झकेला ब्रेसवेलकरवी झेलबाद करून न्यूझीलंडला चौथे यश मिळवून दिले. या 26 वर्षीय फलंदाजाने किवी वेगवान गोलंदाजांविरुद्ध सावधगिरीने फलंदाजी केली. त्याने प्रथम 68 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर 128 चेंडूंमध्ये त्याच्या डावाचे शतकात रूपांतर केले. त्याने 148 चेंडूंत 11 चौकार आणि 5 षटकारांसह 150 धावा फटकावल्या. विआन मुल्डरने 60 चेंडूत 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 64 धावा केल्या. सेनुरन मुथुसामी (2) स्वतात बाद झाला. यासह द. आफ्रिकेच्या संघाने निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 304 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि विल्यम ओ'रोर्क यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मायकेल ब्रेसवेलने एका फलंदाजाला बाद केले.
विजयासाठी 305 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 10 व्या षटकात 50 धावांवर पहिली विकेट गमावली. विल यंग 19 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विल्यमसन मैदानात आला. त्याने डेव्हॉन कॉनवेच्या साथीने डावाची धुरा सांभाळली. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 187 धावांची भागीदारी केली.
यादरम्यान, विल्यमसनने 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तर त्यानंतर 72 चेंडूत शतक झळकावले. शतकाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या डेव्हॉन कॉनवेला (97) ज्युनियर डालने बाद करत न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. त्यानंतर न्यूझीलंडने डॅरिल मिशेल (10) आणि टॉम लॅथम (0) यांच्या रूपात दोन विकेट गमावल्या.
यानंतर विल्यमसनने ग्लेन फिलिप्सच्या साथीने संघाला विजयाकडे नेले. न्यूझीलंडने 48.4 षटकांत 308 धावा केल्या आणि सहा विकेट्सने सामना जिंकला. विल्यमसनने 113 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 133 धावा केल्या. ग्लेन फिलिप्सने 32 चेंडूंत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 29 धावा काढल्या. द. आफ्रिकेकडून एस मुथुस्वामीने दोन विकेट घेतल्या. ज्युनियर डल आणि इथन बॉश यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.