विशाखापट्टणम; वृत्तसंस्था : मेरिझॅन कॅप (56), ट्रियॉन (62) व नदिने डी क्लर्कने (37) यांनी दडपण झुगारून सोमवारी येथे झालेल्या रोमांचक महिला विश्वचषक सामन्यात दक्षिण आफ्रिकेला बांगला देशवर 3 गडी राखून विजय मिळवून दिला. वास्तविक, 233 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने एकवेळ 23 व्या षटकात 78 धावांत 5 गडी गमावले होते. पण, अष्टपैलू खेळाडू मेरिझॅन कॅप आणि क्लो ट्रियॉन यांनी सहाव्या गड्यासाठी 85 धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर विजय खेचून आणला. पुढे क्लर्कने त्यावर शिक्कामोर्तब केले.
दक्षिण आफ्रिकेने अखेरीस केवळ 3 चेंडू बाकी असताना हे लक्ष्य गाठले. कॅप आणि ट्रियॉन बाद झाल्यानंतर क्लर्कने 29 चेंडूंत नाबाद 37 धावांची खेळी केली. तिला शूर्णा अख्तरने लाँग-ऑफवर जीवदान दिले होते. त्यानंतर डी क्लर्कने चौकार आणि षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. डी क्लर्कने यापूर्वी भारताविरुद्धही सामना जिंकून देणारी खेळी केली होती.
प्रारंभी युवा अष्टपैलू खेळाडू शूर्णा अख्तरने केलेल्या झंझावाती 35 चेंडूंतील नाबाद 51 धावांच्या खेळीच्या जोरावर बांगला देशने संथ सुरुवातीनंतरही 6 गडी गमावून 232 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली. शर्मिन अख्तर (50) आणि कर्णधार निगार सुलताना (32) यांनी तिसर्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करून बांगला देशच्या डावाला आकार दिला होता.