केर्न्स : डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर द. आफ्रिकेने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली आहे. केर्न्स येथील कॅझलीज स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात, टेंबा बावुमाच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा ९८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने ८ गडी गमावून २९६ धावांचा डोंगर उभारला. कांगारूंनी जवळजवळ जिंकलेला सामना गमावला. २९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता फक्त ७ षटकांत ६० धावा केल्या. परंतु त्यानंतर ऑस्ट्रेलियाने २९ धावांच्या आत एकामागून एक ६ विकेट गमावल्या आणि ४१व्या षटकातच संपूर्ण संघ १९८ धावांवर तंबूत परतला. अशाप्रकारे त्यांनी सामना ९८ धावांनी गमावला. यासह द. आफ्रिकेने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
द. आफ्रिकेच्या या विजयाचा शिल्पकार डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज ठरला. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीत प्रथमच पाच बळी मिळवण्याचा पराक्रम केला. महाराजने १० षटकांत केवळ ३३ धावा देत ५ महत्त्वपूर्ण बळी घेतले. यात मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस, ॲलेक्स कॅरी आणि ॲरॉन हार्डी यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे, यापैकी एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
ऑस्ट्रेलियाने ६० धावांवर पहिली विकेट गमावली होती, मात्र ८९ धावांपर्यंत पोहोचताना त्यांचे ६ फलंदाज तंबूत परतल्याने संघाचा डाव गडगडला. कर्णधार मिचेल मार्शने एकाकी झुंज देत ८८ धावांची खेळी केली. आठव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या बेन ड्वारशुइससोबत त्यांनी सातव्या गड्यासाठी ७१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. ड्वारशुइसनेही ७१ धावांचे योगदान दिले. १७४ धावांवर मार्श बाद होताच ऑस्ट्रेलियाचा पराभव निश्चित झाला. अखेरीस ४०.५ षटकांत ऑस्ट्रेलियाचा संघ १९८ धावांवर सर्वबाद झाला. नांद्रे बर्गर आणि लुंगी एन्गिडी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी, टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने दमदार सुरुवात केली. त्यांच्या आघाडीच्या फळीने उत्कृष्ट फलंदाजी केली. सलामीवीर एडन मार्करम आणि रायन रिकेल्टन यांनी पहिल्या गड्यासाठी ९२ धावांची भक्कम सलामी दिली. रिकेल्टन (३३) बाद झाल्यानंतर कर्णधार बावुमा यांनी मार्करमची साथ दिली. मार्करमने ८२ धावांची शानदार खेळी केली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या मॅथ्यू ब्रीट्झकेनेही अर्धशतक झळकावले. ब्रीट्झकेने ४०व्या षटकात ५६ चेंडूंवर ५७ धावा करून तो बाद झाला. ४१व्या षटकात ट्रेव्हिस हेडने ट्रिस्टन स्टब्स आणि डेवाल्ड ब्रेविस यांचे बळी घेत दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला.
शेवटच्या षटकांमध्ये वियान मुल्डरने २६ चेंडूंत नाबाद ३१ धावांची खेळी करत संघाला २९६ धावांपर्यंत पोहोचवले. कर्णधार बावुमाने ६५ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून पार्ट टाईम गोलंदाज ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक ४ बळी मिळवले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आफ्रिकेचा हा धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी १९९४ मध्ये आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८२ धावांनी विजय मिळवला होता. आता आफ्रिकेने तो विक्रम मोडीत काढला आहे.