स्पोर्ट्स

RR vs SRH : राजस्थानचा विजयरथ कोण रोखणार? हैदराबादच्या गोलंदाजीची सत्त्वपरीक्षा

IPL 2026 : अव्वलस्थान आणखी भक्कम करण्याचे राजस्थानचे इरादे

रणजित गायकवाड

हैदराबाद : यंदाच्या आयपीएल स्पर्धेत यापूर्वीच विजयी चौकार ठोकणारा राजस्थान रॉयल्सचा संघ आज (सोमवार, दि. 13) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध देखील तीच घोडदौड कायम राखण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, आतापर्यंत 4 सामन्यांत 3 पराभव पत्करावे लागलेल्या हैदराबादचा घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न असेल.

गुणतालिकेत तूर्तास, राजस्थान रॉयल्सचा संघ 4 सामन्यांत सलग 4 विजयांसह अव्वलस्थानी विराजमान आहे तर हैदराबादचा संघ केवळ एका विजयासह सहाव्या स्थानी फेकला गेला आहे. राजस्थानच्या आतापर्यंतच्या यशाचे मुख्य गमक त्यांच्या फलंदाजीतील ‌‘पॉवर‌’मध्ये आहे. यशस्वी जैस्वालची नजाकत आणि युवा सनसनाटी फलंदाज वैभव सूर्यवंशीची बेधडक फटकेबाजी यामुळे राजस्थानने पॉवर प्लेमध्ये प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या आहेत. गोलंदाजीत जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, रवी बिश्नोई उत्तम योगदान देत आले आहेत. शिवाय, जडेजाच्या समावेशामुळे फिरकी आणखी मजबूत झाली आहे.

हैदराबादचा संघ दबावाखाली

दुसरीकडे, माजी विजेता सनरायझर्स हैदराबादचा संघ अद्याप फॉर्मच्या शोधात आहे. ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या स्फोटक जोडीवर हैदराबादची फलंदाजी अवलंबून असली, तरी त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येत आहे. प्रभारी कर्णधार इशान किशनची बॅट पहिल्या सामन्यानंतर अजिबात तळपलेली नाही. त्यामुळे, धावांची सर्व जबाबदारी हेन्रिक क्लासेनवरच (184 धावा) राहत आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT