चंदिगड; वृत्तसंस्था : एकीकडे, उत्तुंग टोलेबाजीचा आनंद, तर दुसरीकडे एलिमिनेटर जिंकल्याचा जल्लोष. एकीकडे, ख्रिस गेलचा हंगामात सर्वाधिक 59 षटकारांचा विक्रम मोडल्याचा आनंद, तर दुसरीकडे सर्वात जलद 30 चेंडूंत शतकाची संधी हुकल्याची हुरहूर, अशा हिंदोळ्यात वैभव सूर्यवंशीची अवघ्या 29 चेंडूंतील 97 धावांची झंझावाती खेळी येथे प्रत्यक्ष मैदानात अवतरली आणि राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध या हंगामातील सर्वात वादळी विजय मिळवून देऊन गेली. वैभवच्या या झंझावाती खेळीने हैदराबादच्या गोलंदाजांचा गेमप्लॅन, त्यांचा वेग, त्यांची लाईन अँड लेंग्थ या सार्याचाच जणू पालापाचोळाच करून टाकला!
यंदाच्या हंगामातील सर्वात रोमांचक खेळाची अनुभूती देणार्या या लढतीत वैभवच्या मैदानातील झंझावाताने ख्रिस गेलच्या रेकॉर्डबुकवर जोरदार प्रहार केले. हा प्रहार एक विक्रम मागे टाकणारा ठरला. मात्र, याचवेळी दुसरा विक्रम थोडक्यात निसटल्याने हुरहूरही राहिली. या विजयासह राजस्थान रॉयल्सने दुसर्या क्वालिफायरमध्ये धडक मारली असून, फायनलमधील दुसरे तिकीट निश्चित करण्यासाठी गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांची आता निर्णायक लढत उद्या (दि. 29) रोजी रंगणार आहे. येथील एलिमिनेटर लढतीत राजस्थानने 243 धावांचा डोंगर रचल्यानंतर प्रत्युत्तरात सनरायजर्स हैदराबादला विजयापासून बरेच दूर राहावे लागले.
प्रारंभी, मैदानाच्या चोहो बाजूंनी एकापेक्षा एक अशा सरस, उत्तुंग चौकार, षटकारांच्या आतषबाजीने तमाम क्रिकेटप्रेमींची मने जिंकणार्या वैभव सूर्यवंशीने अवघ्या 29 चेंडूंत 97 धावा चोपल्यानंतर याच बळावर राजस्थान रॉयल्सने 8 बाद 243 धावांचा अक्षरश: पाऊस पाडला. वैभवने येथे ख्रिस गेलचा एकाच हंगामातील सर्वाधिक 59 षटकारांचा विक्रम मोडीत काढत टी-20 क्रिकेटमधील आपल्या झंझावाताची आणखी एकदा जाज्वल्य प्रचिती दिली!
सनरायझर्स हैदराबादने या लढतीत नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानला प्रथम फलंदाजीला पाचारण केले आणि ही येथील सर्वात मोठी घोडचूक ठरल्याचे वैभवच्या फटकेबाजीमुळे अधोरेखित झाले. प्रारंभी कमिन्ससारख्या कसलेल्या गोलंदाजाला सलग तीनवेळा षटकारासाठी पिटाळून लावल्यानंतर या दिग्गज फलंदाजाने मलिंगा, साकिब, प्रफुल्ल हिंगे यांच्या गोलंदाजीचा समाचार घेण्यात कसर सोडली नाही. अंतिमत: प्रफुल्ल हिंगेच्या स्लोअर वनवर अंदाज चुकल्याने 97 धावांवर बाद झाल्याने वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळीचा समारोप झाला आणि 40 मिनिटांचा झंझावात अचानक स्तब्ध झाल्यानंतर क्षणभर चाहतेही यावर विश्वास ठेवू शकले नाहीत. स्वत: वैभवदेखील तंबूकडे परतत असताना त्याचीही चाल शब्दश: मंदावली होती.
विजयासाठी 244 धावांचे आव्हान असताना सनरायझर्स हैदराबादचा एकही फलंदाज साधे अर्धशतकही झळकावू शकला नाही आणि अंतिमत: त्यांना 19.2 षटकांत सर्वबाद 196 धावांवर समाधान मानावे लागले. नितीशकुमार रेड्डीने सर्वाधिक 38, सलील अरोराने 35 तर इशान किशनने 33 धावा जमवल्या. अन्य बहुतांशी फलंदाजांनी हाराकिरीच केली आणि यासह हैदराबादचे या हंगामातील आव्हान संपुष्टात आले.
मोडता मोडता राहिला ख्रिस गेलचा सर्वात जलद शतकाचा विक्रम!
‘आयपीएल’मध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम ख्रिस गेलच्या खात्यावर असून, त्याने 30 चेंडूंत शतक झळकावले आहे. येथे तर वैभव सूर्यवंशीने अवघ्या 28 चेंडूंत 97 धावा फटकावत हा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यापर्यंत झेप घेतलीच होती. मात्र, 29 व्या चेंडूवर स्लोअर वन षटकारासाठीच भिरकावून देण्याचा प्रयत्न त्याचा सपशेल फसला आणि ख्रिस गेलचा सर्वात जलद शतकाचा विक्रम मोडता मोडता राहिला! 97 धावांवर बाद व्हावे लागल्यानंतर वैभव क्षणभर तेथेच थबकला आणि चाहत्यांमधूनही हुकलेल्या विक्रमाबद्दल हळहळ व्यक्त होत राहिली!
अवघ्या 15 चेंडूंत मोडला गेलचा तो विक्रम!
वैभव सूर्यवंशी येथे मैदानात उतरला, त्यावेळी एक ाच हंगामात सर्वाधिक 59 षटकारांचा ख्रिस गेलचा विक्रम मागे टाकण्यासाठी त्याला 6 षटकारांची आवश्यकता होती. मात्र, यासाठी वैभवला केवळ 15 चेंडूच पुरेसे ठरले. चौथ्या षटकात साकिबला वाईड लाँग ऑफवरील स्लोअर वनवर उत्तुंग षटकार खेचत त्याने ‘आयपीएल’मध्ये 60 षटकारांचा नवा विक्रम प्रस्थापित केला!
काय होता प्रफुल्ल हिंगेचा गेमप्लॅन?
वैभव सूर्यवंशी 28 चेंडूंत 97 धावांवर खेळत असताना तो 30 चेंडूंत शतकाचा गेलचा विक्रम मोडीत काढण्याचा पुढील चेंडूवरच प्रयत्न करणार, हे साहजिकच होते. याच पार्श्वभूमीवर प्रफुल्लने वैभवची उंची लक्षात घेत त्याला आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. वैभवने येथे अपर कट मारण्याचा जोरदार प्रयत्न केला; पण यात त्याचा अंदाज चुकला आणि आर. स्मरणने सोपा झेल टिपल्यानंतर वैभवची नामी संधी हुकली.
6 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये बरसल्या 80 धावा!
एकदा सेट झाल्यानंतर चेंडू जणू फुटबॉलप्रमाणे दिसत असावा, अशा थाटात वैभव सूर्यवंशीने एकापाठोपाठ एक चौकार, षटकारांची आतषबाजीच सुरू केली आणि या बळावर राजस्थानने पॉवर प्लेच्या 6 षटकांत तब्बल 80 धावांची बरसात केली. 6 षटकांअखेर वैभव 20 चेंडूंत 60, तर जैस्वाल 16 चेंडूंत 19 धावांवर खेळत होते.
गेलच्या ‘त्या’ विक्रमावेळी सूर्यवंशी होता अवघ्या एका वर्षाचा!
ख्रिस गेलने ‘आयपीएल’मध्ये 2012 साली एकाच हंगामात सर्वाधिक 59 षटकारांचा विक्रम प्रस्थापित केला, त्यावेळी आता हा विक्रम लीलया मागे टाकणारा वैभव सूर्यवंशी अवघ्या एका वर्षाचा होता, हे देखील येथे लक्षवेधी आहे!