जयपूर; वृत्तसंस्था : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने शनिवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर यजमान राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी धुव्वा उडवला. या मोठ्या विजयासह गुजरातने गुणतालिकेत 14 गुणांसह दुसर्या स्थानी झेप घेतली आहे. तूर्तास, सनरायझर्स हैदराबाद अव्वल स्थानी असून गुजरात त्यांच्यापेक्षा निव्वळ धावगतीच्या निकषावर किंचित मागे आहे. दुसरीकडे, राजस्थानचा युवा कर्णधार यशस्वी जैस्वालला मात्र आपल्या नेतृत्वाखालील पहिल्याच पराभवाचा सामना करावा लागला.
गिल-सुदर्शनची आक्रमक सलामी
प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर गुजरात टायटन्सने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर शुभमन गिलने अवघ्या 44 चेंडूंत 9 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने 84 तर साई सुदर्शनने 36 चेंडूंत 55 धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकांत वॉशिंग्टन सुंदर आणि राहुल तेवतिया यांनी फटकेबाजी करत गुजरातला 20 षटकांत 4 बाद 229 धावांचा डोंगर उभा करून दिला.
राशीद खानच्या फिरकीची जादू
230 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा संघ गडबडला. युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने 16 चेंडूंत 36 धावांचा फ्लाईंग स्टार्ट दिला तर अनुभवी रवींद्र जडेजाने 38 धावा जोडल्या. मात्र, ठरावीक अंतराने विकेट पडत गेल्याने राजस्थानला विजयापासून कित्येक कोस दूरच राहावे लागले. फिरकीपटू राशीद खानने सर्वाधिक 4 बळी घेत राजस्थानचे कंबरडे मोडले. त्याला जेसॉन होल्डर (3 बळी) आणि कागिसो रबाडा (2 बळी) यांनी मोलाची साथ दिली. अखेर राजस्थानचा डाव 16.3 षटकांत 152 धावांवर आटोपला आणि गुजरातने 77 धावांनी एकतर्फी विजय साकारला.