रोमारियो शेफर्डने २०२५ च्या आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक ठोकले. File Photo
स्पोर्ट्स

RCB vs CSK : चेन्नईला हरवून आरसीबी ‘टॉप’वर

सीएसकेचा नववा पराभव; आयुष म्हात्रेची झुंज व्यर्थ

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर; वृत्तसंस्था : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाने घरच्या मैदानात रंगलेल्या 200 पारच्या लढाईत चेन्नई सुपर किंग्जला रोखून दाखवले. या सामन्यातील विजयासह आरसीबी संघाने 16 गुण आपल्या खात्यात जमा करत प्ले ऑफचे आपले तिकीट जवळपास पक्के केले आहे. अखेरच्या षटकात 15 धावांची गरज असताना रजत पाटीदारने यश दयालच्या हाती चेंडू सोपवला. मॅच फिनिशर महेंद्रसिंग धोनी आणि सेट झालेला जडेजा क्रीजवर होते, पण अखेरच्या षटकात धोनी पायचित झाला. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या शिवम दुबेने 3 चेंडूंत 13 धावांची गरज असताना शिवम दुबेने षटकार मारला. तो चेंडू नो बॉल ठरला. त्यामुळे सीएसकेला 3 चेंडूंत 6 धावांची गरज होती. पण त्यानंतर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत यश दयालने हातून निसटणारा सामना संघाच्या बाजूने फिरवला. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच आरसीबी संघाने एका हंगामात दोन्ही सामन्यांत चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले आहे.

विराट कोहली (62) आणि रोमारियो शेफर्ड (14 चेंडूंत 53 धावा) यांच्यामुळे आरसीबीने 5 बाद 213 धावा केल्या. चेन्नईची लढाई दोन धावांनी कमी पडली. 17 वर्षीय आयुष म्हात्रे (94) आणि रवींद्र जडेजा (77) यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही चेन्नई सुपर किंग्जला नवव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूकडून जेकॉब बेथेल आणि विराट कोहली यांनी पॉवर प्लेमध्ये मोठे शॉटस् खेळत धावा जोडण्यास सुरुवात केली. याचदरम्यान मथिशा पथिराना आणि रवींद्र जडेजा यांच्यात झेल घेताना धडक झाल्याने 28 धावांवर बेथेलला जीवदान मिळाले. याचा त्याने फायदा घेतला. बेथेलने आधी अर्धशतक पूर्ण केले. या दोघांची 97 धावांची भागीदारी झाली असताना बेथेलला मथिशा पथिरानाने डेवाल्ड ब्रेविसच्या हातून झेलबाद केले. बेथेलने 33 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 55 धावांची खेळी केली. विराटनेही नंतर 29 चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे हंगामातील सातवे, तर सलग चौथे अर्धशतक आहे. तो पुढेही चांगला खेळत होता. पण 12 व्या षटकात त्याला सॅम कुरेनने खलील अहमदच्या हातून झेलबाद करत माघारी धाडले. विराटने 33 चेंडूंत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 62 धावांची खेळी केली.

विराट बाद झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल 17 धावांवर आणि रजत पाटीदारला 11 धावांवर पथिरानाने बाद केले. जितेश शर्माही 7 धावा करून नूर अहमदच्या गोलंदाजीवर ब्रेविसकडे झेल देत आपली विकेट गमावली. मात्र खलील अहमदचे 19 वे षटक वादळी ठरले. रोमारियो शेफर्डने 4 षटकार आणि 2 चौकारासह 33 धावा केल्या. त्यामुळे बेंगळुरूने मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच केली. त्याने शेवटच्या षटकातही आक्रमक खेळ केला. त्याने 14 चेंडूंत अर्धशतक करत बेंगळुरूला 20 षटकांत 5 बाद 213 धावांपर्यंत पोहोचवले. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसर्‍या क्रमांकाचा खेळाडू ठरला. चेन्नईकडून मथिशा पथिरानाने 3 विकेटस् घेतल्या. नूर अहमद आणि सॅम कुरेन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

शेफर्डचे 14 चेंडूंत अर्धशतक; कमिन्स, राहुलशी बरोबरी

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या तडाखेबाज फलंदाज रोमारियो शेफर्डने गोलंदाजाच्या डोळ्यात पाणी आणले. शेफर्डने 379 च्या स्ट्राईक रेटने फक्त 14 चेंडूंत 53 धावा केल्या. या कामगिरीसह शेफर्ड आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरला आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम राजस्थान रॉयलचा यशस्वी जैस्वालच्या नावावर आहे. जैस्वालने 2013 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध अवघ्या 13 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यानंतर या यादीत के.एल. राहुल दुसर्‍या, पॅट कॅमिन्स तिसर्‍या, रोमारियो शेफर्ड चौथ्या स्थानावर आहेत. या सर्व फलंदाजांनी प्रत्येकी 14 चेंडूंत अर्धशतक केले आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक :

1) यशस्वी जैस्वाल - 13 चेंडू

(विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 2013)

2) के. एल. राहुल- 14 चेंडू

(विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2018)

3) पॅट कमिन्स- 14 चेंडू

(विरुद्ध नाईट रायडर्स, 2022)

4) रोमारियो शेफर्ड- 14 चेंडू

(विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज 2025)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT