‘आरसीबी’चा 10 वर्षांनी वानखेडेवर झेंडा 
स्पोर्ट्स

‘आरसीबी’चा 10 वर्षांनी वानखेडेवर झेंडा

MI vs RCB : मुंबई इंडियन्स होम ग्राऊंडवर 12 धावांनी पराभूत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूने सांघिक कामगिरीच्या जोरावर 10 वर्षांनंतर मुंबईला वानखेडे स्टेडियमवर हरवले. विराट कोहली (67) आणि रजत पाटीदार (64) यांच्या अर्धशतकांमुळे ‘आरसीबी’ने 5 बाद 221 धावांचा डोंगर उभा केला. याला प्रत्युत्तर देताना मुंबईकडून तिलक वर्मा (56) आणि हार्दिक पंड्या (42) यांनी 34 चेंडूंत 89 धावांची भागीदारी केली. परंतु, मोक्याच्या क्षणी हे दोघे बाद झाल्याने मुंबईचे प्रयत्न 12 धावांनी तोकडे पडले. ‘आरसीबी’ने यापूर्वी 2015 साली वानखेडेवर विजय मिळवला होता.

सोमवारी झालेल्या सामन्यात ‘आरसीबी’च्या द्विशतकी आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा 9 चेंडू आणि रायन रिकेल्टन 10 चेंडू खेळून तंबूत परतले. दोघांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. यानंतर विल जॅक्स आणि सूर्यकुमारने फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतु, ‘आरसीबी’च्या गोलंदाजांनी त्यांना तितकेसे स्वातंत्र्य दिले नाही. कृणाल पंड्याने विल जॅक्सला (22) कोहलीच्या हातात झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल सोडणार्‍या यश दयालने सूर्यकुमारला (28) पुढच्या षटकात बाद केले. यावेळी मुंबईच्या धावा झाल्या होत्या 12 षटकांत 4 बाद 99 धावा आणि त्यांना उरलेल्या 8 षटकांत करायच्या होत्या 123 धावा.

मागच्या सामन्यात स्लो स्ट्राईक रेटमुळे मैदानाबाहेर जावे लागलेल्या तिलक वर्माने सगळा राग ‘आरसीबी’च्या गोलंदाजावर काढला. तीन षटकांत 16 धावा देणार्‍या सुयश शर्माच्या चौथ्या षटकात 17 धावा कुटल्या. हेझलवूडच्या पुढच्या षटकात हार्दिक पंड्याने जाळ अन् धूर काढत 22 धावा चोपल्या. त्याच्या पट्ट्यातून भाऊ कृणाल पंड्याही सुटला नाही, त्यालाही सलग दोन षटकार हार्दिकने ठोकले. या षटकात 19 धावा आल्या. मुंबईला शेवटच्या 30 चेंडूंत 65 धावांची आवश्यता होती. भुवनेश्वरच्या षटकात तिलकने 13 धावा घेतल्या. यश दयालने 11 धावा दिल्या. भुवनेश्वर कुमारने आपल्या चौथ्या षटकात तिलक वर्माचा महत्त्वपूर्ण बळी घेऊन भागीदारी तोडली आणि ‘आरसीबी’ला सामन्यात परत आणले. या षटकात 13 धावा निघाल्या होत्या, त्यामुळे शेवटच्या दोन षटकांत 28 धावांचे आव्हान उरले होते. हेझलवूडचे हे षटक निर्णायक ठरले. त्याने पहिल्याच चेंडूवर हार्दिकला बाद करून सामना मुंबईच्या हातातून खेचून घेतला. शेवटच्या षटकात 19 धावांचे रक्षण करण्याची जबाबदारी कृणाल पंड्यावर पडली. यात तो यशस्वी झाला. त्याने पहिल्या चेंडूवर सँटेनर, दुसर्‍या चेंडूवर चहर तर चौथ्या चेंडूवर नमन धीर यांना बाद केले.

तत्पुर्वी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. बंगळुरुकडून विराट कोहली, कर्णधार रजत पाटिदार, जितेश शर्मा यांनी आक्रमक खेळ केला. विराटने 42 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 67 धावांची खेळी केली, तर रजतने 32 चेंडूत 64 धावांची खेळी केली, ज्यात 5 चौकार आणि 4 षटकार मारले. जितेश शर्माने 2 चौाकर आणि 4 षटकारांसह 19 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनेही 22 चेंडूत 37 धावांची चांगली खेळी केली. यामुळे बंगळुरूने 20 षटकात 5 बाद 221 धावा केल्या होत्या.

मुंबई इंडियन्ससाठी स्पेशल सामना

हा सामना मुंबई इंडियन्ससाठी खास आहे. कारण, त्यांचा हा टी-20 क्रिकेटमधील 288 वा सामना आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स आता सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा संघ ठरला आहे. त्यांनी सोमरसेटच्या 287 टी-20 सामन्यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

विराट कोहलीने रचला इतिहास! टी-20 मध्ये 13,000 धावांचा टप्पा पार

  • इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 20 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात नवा विक्रम रचला आहे. कोहलीने आपल्या टी-20 क्रिकेट कारकिर्दीत 13,000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

  • या सामन्यापूर्वी कोहलीने टी-20 मध्ये 12,983 धावा केल्या होत्या. परंतु, मुंबईविरुद्ध 17 धावा पूर्ण करताच तो 13,000 धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत सामील झाला. कोहलीपूर्वी फक्त ख्रिस गेल, अ‍ॅलेक्स हेल्स, शोएब मलिक आणि किरॉन पोलार्ड यांनीच टी-20 मध्ये 13,000 धावा पूर्ण केल्या आहेत.

  • कोहलीने अ‍ॅलेक्स हेल्सला मागे टाकले आणि टी-20 मध्ये सर्वात जलद 13,000 धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज बनला. कोहलीने 403 सामन्यांच्या 386 डावांमध्ये 13,000 टी-20 धावा पूर्ण केल्या. त्याच्या पुढे वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आहे. गेलने 389 सामन्यांपैकी 381 डावांमध्ये हा आकडा गाठला. हेल्सने 478 सामन्यांपैकी 474 डावांमध्ये या धावा केल्या होत्या.

  • जसप्रीत बुमराह व विराट कोहली यांच्यातली टशन पाहण्यासाठी सारेच उत्सुक होते. चौथ्या षटकांत बुमराहला गोलंदाजीला आणले गेले आणि पडिक्कलने एक धाव घेत कोहलीला स्ट्राईक दिली. वानखेडे स्टेडियम दणाणून गेले आणि कोहलीने अनपेक्षित षटकार खेचला.

संक्षिप्त धावफलक

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू : 20 षटकांत 5 बाद 221 धावा. (विराट कोहली 67, रजत पाटीदार 64, जितेश शर्मा 40. हार्दिक पंड्या 2/45.

मुंबई इंडियन्स : 20 षटकांत 9 बाद 209 धावा. (तिलक वर्मा 56, हार्दिक पंड्या 42. कृणाल पंड्या 4/45.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT