रियाध; वृत्तसंस्था : पोर्तुगालचा सुपरस्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा फुटबॉलच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. तो 5 वेगवेगळ्या देशांतील 5 वेगवेगळ्या क्लब्सकडून 100 किंवा त्याहून अधिक गोल करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
शनिवारी अल अहली विरुद्ध झालेल्या अरब सुपर कपच्या अंतिम सामन्यात गोल करून रोनाल्डोने अल नासर क्लबसाठी 100 गोलांचा टप्पा पूर्ण केला. यासह त्याने हा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला. मात्र, 2025 अरब सुपर कपच्या अंतिम सामन्यातील रोनाल्डोची ही कामगिरी त्याच्या संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकली नाही. निर्धारित वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत सुटल्यानंतर, पेनल्टी शूटआऊटमध्ये अल नासरला अल अहलीकडून 3-5 असा पराभव पत्करावा लागला.
यापूर्वी त्याने तीन अन्य नामांकित क्लब्ससाठी 100 पेक्षा जास्त गोल झळकावले आहेत. या कामगिरीसह रोनाल्डो इंग्लिश प्रीमियर लीग, स्पॅनिश ला लीगा, इटालियन सेरी आ आणि सौदी अरेबियन प्रो लीग या चार वेगवेगळ्या व्यावसायिक लीगमध्ये 100 किंवा त्याहून अधिक गोल करणारा एकमेव खेळाडू बनला आहे.
रोनाल्डोच्या या विक्रमी प्रवासाची सुरुवात मँचेस्टर युनायटेडपासून झाली. 2009 मध्ये रियल माद्रिदमध्ये सामील झाल्यानंतर, तो 438 सामन्यांमध्ये 450 गोल करून क्लबचा सर्वकालीन सर्वोच्च गोलस्कोअरर बनला. 2018 मध्ये, त्याने इटलीतील बलाढ्य क्लब युव्हेंटसमध्ये प्रवेश केला आणि तीन हंगामांत 101 गोल करत संघाला सेरी आ चे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आता, 2023 पासून अल नासरसोबत खेळताना, रोनाल्डोने सौदी अरेबियामध्येही गोलांचे शतक साजरे केले आहे. याशिवाय, त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोर्तुगाल राष्ट्रीय संघासाठी सर्वाधिक 135 गोल आणि युफा चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक 140 गोल करण्याचा विक्रमही आहे.
रोनाल्डो आता आपल्या कारकिर्दीत 1,000 गोलांचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य गाठणार का, याची फुटबॉल वर्तुळाला उत्सुकता असेल.