स्पोर्ट्स

Ronaldo-Georgina Rodriguez : लग्‍न तर झाले; पण घटस्फोट झाल्यास रोनाल्डो होणार भिकेकंगाल!

सुपरस्‍टार रोनाल्‍डोचा ‘लाईफटाईम गोल’; मॅडम मात्र पक्क्या बिझनेस वूमन!

रणजित गायकवाड

कॅसकाईस-पोर्तुगाल : जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू ख्रिस्‍तियानो रोनाल्डो शेवटी लग्‍नबेडीत अडकला आहे! गेली १० वर्षे जिच्यासोबत तो लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता, त्या आपल्या लाडक्या प्रेयसीला म्हणजेच ३२ वर्षीय मॉडेल जॉर्जिया रॉड्रिग्जला त्याने अखेर अधिकृत ‘मिसेस रोनाल्डो’ बनवले आहे; पण थांबा! हे लग्‍न जितके रोमँटिक आहे, त्याहून कितीतरी पटीने या लग्‍नामागील कायदेशीर कराराचा ड्रामा अधिक थरारक आणि अंगावर काटा आणणारा आहे!

कारण, जॉर्जियाने रोनाल्‍डोशी विवाहपूर्व अटींचा करारच केला असून, यामुळे भविष्‍यात कधी दुर्दैवाने घटस्‍फोटाची वेळ आलीच, तर रोनाल्‍डोला पार सर्व खिसे रिकामे करावे लागणार आहेत! मॅडम पक्‍क्‍या बिझनेस वूमन आहेत, हेच यानिमित्ताने अधोरेखित हाेते आहे!

गेल्या १० वर्षांपासून ज्या रोमान्सची जगभरात चर्चा होती, त्या आपल्या लव्हस्टोरीला रोनाल्डोने शाही विवाह सोहळ्याचा फिनिशिंग टच दिला. ३२ वर्षीय ग्लॅमरस मॉडेल जॉर्जिया रॉड्रिग्जसोबत त्याने पोर्तुगालमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये गुप्तपणे; पण अत्यंत थाटात लग्‍नगाठ बांधली आहे. या लग्‍नाची सर्वात चटपटीत आणि हटके गोष्ट म्हणजे, रोनाल्डोची पाचही मुले (क्रिस्टियानो ज्युनिअर, मतेओ, इव्हा, अलाना आणि बेला) या सोहळ्याला आवर्जून हजर हाेती.

मीडियाला चकवा; सिक्रेट मॅरेज अन् सोशल मीडियावर राडा!

नेहमी कॅमेऱ्याच्या गराड्यात राहणाऱ्या रोनाल्डोने आपल्या या विवाह सोहळ्यासाठी मीडियाला पार गुंडाळले होते. पोर्तुगालच्या एका शांत, देखण्या समुद्रकिनाऱ्यावर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा गुपचूप उरकण्यात आला. रोनाल्डोने मैदानावर हजारो गोल केले असतील; पण जॉर्जियाच्या रूपाने त्याने आयुष्यातील सर्वात महागडा आणि सुंदर ‘लाईफटाईम गोल’ केला आहे, अशीच चर्चा यानिमित्ताने सोशल मीडियावर रंगते आहे.

लग्‍न तर झाले; पण घटस्फोट झाल्यास रोनाल्डो होणार भिकेकंगाल!

आता या लग्‍नामागील सर्वात मोठी आणि खळबळजनक माहिती म्‍हणजे लग्‍न जरी प्रेमाचे असले, तरी जॉर्जियाने कायदेशीर बाबींमध्ये पक्की ‘फिल्डिंग’ लावली आहे. मीडिया रिपोर्टर्सनुसार, लग्‍नापूर्वी दोघांमध्ये एक अतिशय कडक ‘प्री-नप्टिअल ॲग्रीमेंट’ (लग्‍नापूर्वीचा करार) झाला आहे. जर भविष्यात या दोघांचा घटस्फोट झाला, तर रोनाल्डोला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

काय आहेत या गुप्त करारातील अटी?

सुरुवात महिन्‍याच्‍या पोटगीपासून : घटस्फोट झाल्यास रोनाल्डोला जॉर्जियाला दरमहा तब्बल १ लाख २१ हजार डॉलर्स (सुमारे १ कोटी रुपये) पेन्शन म्हणून आयुष्यभर द्यावे लागतील.

आलिशान बंगला नावावर : माद्रिदमधील रोनाल्डोचा ५.६ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४७ कोटी रुपये) किमतीचा आलिशान ‘ला फिका’ बंगला थेट जॉर्जियाच्या मालकीचा होईल.

मुलांचा सांभाळ : मुलांच्या उच्च राहणीमानासाठी रोनाल्डोला दरमहा ५ लाख डॉलर्स (जवळपास ४ कोटी रुपये) चाईल्ड सपोर्ट द्यावा लागेल.

एकरकमी पोटगी : इतकेच नाही, तर ब्रेकअपनंतर रोनाल्डोला तब्बल ५० दशलक्ष डॉलर्स (४०० कोटींहून अधिक रुपये) एकरकमी द्यावे लागतील, अशीही चर्चा आहे!

‘मॉल’मधली ती पहिली नजर... अन् रोनाल्डो थेट प्रेमाच्‍या जाळ्यात!

या दोघांची प्रेमकथा म्हणजे जणू बॉलीवूडचा सिनेमाच! २०१६ मध्ये माद्रिदच्‍या एका स्टोअरमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम करणाऱ्या जॉर्जियावर रोनाल्डोची नजर पडली आणि फुटबॉलचा किंग पहिल्याच नजरेत घायाळ झाला. ‘ती पहिली नजर आणि रोनाल्डो थेट प्रेमाच्या जाळ्यात,’ अशी ही कहाणी तब्बल १० वर्षे लिव्ह-इनमध्ये सुसाट धावली. शेवटी रोनाल्डोने या नात्‍याचे रूपांतर विवाहात केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT