मुंबई : सुरुवातीला गचांड्या खाल्ल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या गाडीने आता चांगलाच वेग पकडला असून रविवारी (दि.20) त्यांनी चेन्नई सुपर किंग्ज संघावर 9 विकेटस् व 26 चेंडू राखून विजय मिळवला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 176 धावा केल्या, पण मुंबईच्या वादळापुढे त्या पुरेशा नव्हत्या. वानखेडे मैदानावर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या लोकल बॉयनी आपला जलवा दाखवला. रोहित 45 चेंडूंत 76 धावा (4 चौकार, 6 षटकार) आणि सूर्यकुमार 30 चेंडूंत 68 धावा (6 चौकार, 5 षटकार) यांनी 54 चेंडूंत 114 धावांची विजयी भागीदारी केली.
चेन्नईच्या 176 धावांचा पाठलाग करताना रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला झोकात सुरुवात करून दिली. पहिल्या षटकांत रिकेल्टनने दोन चौकार ठोकले. दुसर्या षटकापासून रोहितने चार्ज हातात घेतला. 3 षटकांत 35 धावा फलकावर लागल्याने धोनीने अश्विनला गोलंदाजीस आणले, पण मुंबईने दुसर्या बाजूने धावा गोळा केल्या. पॉवर प्लेमध्ये 62 धावा फलकावर लागल्यानंतर रिकेल्टन (24) बाद झाला.
त्यानंतर सूर्यकुमार यादव रोहितच्या जोडीला आला. दोघेही घरच्या अंगणात खेळत असल्याने आपल्या स्टाईलने खेळ केला. चेन्नईच्या कमकुवत गोलंदाजीचा दोघांनी अक्षरश: बुक्का केला. रोहित शर्माने 33 चेंडूंत यंदाच्या आयपीएलमधील अर्धशतक गाठले. सूर्यानेही 26 चेंडूंत पन्नाशी पार केली. 51 चेंडूंत दोघांची शतकी भागीदारी झाली. मथिशा पथिरानाच्या षटकांत रोहितने एक आणि सूर्याने दोन षटकार ठोकून 15.4 षटकांत सामना संपवला.
तत्पूर्वी, हार्दिक पंड्याने टॉस जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीला बोलावले. शेक राशीद व रचिन रवींद्र सलामीला आले; परंतु चौथ्या षटकात अश्वनी कुमारने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. 17 वर्षीय आयुष म्हात्रेला चेन्नईने पदार्पणाची संधी दिली आणि त्याने सुरुवातही दणक्यात केली. त्याने चौकाराने डावाची सुरुवात केली आणि त्यानंतर दोन खणखणीत षटकार मारून अश्वनीच्या गोलंदाजीची हवा काढली. दीपक चहरसारख्या अनुभवी गोलंदाजालाही आयुषने सुरेख चौकार खेचले. चहरने सातव्या षटकात आयुषला माघारी पाठवले. या पोराने 15 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 32 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने त्याची पाठ थोपटली. आयुषच्या विकेटनंतर चेन्नईच्या धावांचा वेग काहीसा मंदावला. त्यात राशीद (19) मिचेल सँटेनरच्या गोलंदाजीवर बाद झाला.
रवींद्र जडेजा व शिवम दुबे यांनी सीएसकेची धावगती सातच्या सरासरीने कायम राखली होती. चेन्नईने 13.3 षटकांत 100 धावा फलकावर चढवल्या. ट्रेंट बोल्टला 15 व्या षटकात हार्दिकने आणले आणि दुबेने 15 धावा कुटल्या. मूळचा मुंबईचाच असलेल्या दुबेने 30 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. अश्वनीने टाकलेल्या 16 व्या षटकात 26 धावा चोपल्या गेल्या. दुबे 32 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 50 धावांवर जसप्रीतच्या गोलंदाजीवर बाद झाला. मिचेल सँटेनरने 18 व्या षटकात फक्त 5 धावा दिल्या. 19 व्या षटकात धोनी मोठा फटका मारायला गेला; परंतु त्याचा 4 धावांवर तिलक वर्माने झेल घेतला. जड्डूने 35 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 53 धावा केल्या. चेन्नईने 5 बाद 176 धावा उभ्या केल्या.
चेन्नई सुपर किंग्ज : 20 षटकांत 5 बाद 176 धावा. (रवींद्र जडेजा नाबाद 53, शिवम दुबे 50. जसप्रीत बुमराह 2/25)
मुंबई इंडियन्स : 15.4 षटकांत 1 बाद 177 धावा. (रोहित शर्मा 76*, सूर्यकुमार यादव 68*. रवींद्र जडेजा 1/28)