Pudhari File Photo
स्पोर्ट्स

Rohit-Virat ODI : चाहत्यांची चंगळ! रोहित-विराट यांच्यामुळे वाढणार वन डे सामन्यांची संख्या, BCCIकडून ‘खास’ तयारी सुरू

2027 विश्वचषकासाठी टीम इंडियाचे विशेष नियोजन; बीसीसीआयकडून तयारी सुरू

रणजित गायकवाड

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही स्टार क्रिकेटपटू सध्या केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्ये (वन डे फॉरमॅट) खेळत आहेत. या दोघांना असणारी त्यांच्या चाहत्यांची प्रचंड मागणी आणि आगामी 2027 चा वन डे वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

वर्ल्डकपपूर्वी भारतीय संघ जास्तीत जास्त वन डे सामने खेळावा आणि त्यामध्ये रोहित आणि विराट यांनाही अधिकाधिक सामने खेळता यावेत, या दृष्टिकोनातून बीसीसीआयने आगामी वन डे मालिकांचे नियोजन केले आहेत. रोहित, विराटच्या खेळण्याने सामन्यातून प्रचंड महसूल मिळतो, ही बाब अधोरेखित करत बीसीसीआयने नियोजन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इतर क्रिकेट मंडळांचीही मागणी

इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका आणि आयर्लंड यांसारख्या क्रिकेट बोर्डांनी बीसीसीआयला त्यांच्या दौऱ्यांमध्ये अधिक वन डे सामने समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. रोहित आणि कोहली यांच्या उपस्थितीमुळे या सामन्यांना मोठी प्रेक्षकसंख्या लाभते, ज्याचा आर्थिक फायदा संबंधित बोर्डांना होऊ शकतो. बीसीसीआयने या विनंतीचा स्वीकार केला आहे.

फ्यूचर टूर्स प्रोग्राममध्ये बदल

या अतिरिक्त वन डे सामन्यांमुळे भारताच्या मूळ फ्यूचर टूर्स प्रोग्राममध्ये (एफटीपी) बदल होणार असून, आगामी 12 महिन्यांत भारताला अपेक्षेपेक्षा जास्त 50 षटकांचे सामने खेळावे लागणार आहेत.

आगामी वेळापत्रक

आयपीएलनंतर भारत अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि तीन वन डे सामने खेळणार आहे. त्यानंतर युके दौऱ्यावर भारत इंग्लंडविरुद्ध तीन वन डे आणि पाच टी-20 सामने खेळणार आहे. याच दरम्यान आयर्लंडसोबतही मालिका होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर भारत 10 व्हाईट-बॉल सामने (वन डे आणि टी-20) खेळणार आहे. न्यूझीलंडने अतिरिक्त दोन वन डे सामन्यांची मागणी केली होती. या मागणीला बीसीसीआयने हिरवा कंदील दिला आहे. श्रीलंकेत कसोटी दौऱ्यासोबतच वन डे मालिका खेळण्याबाबतही चर्चा सुरू आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT