Virat Kohli Rohit Sharma IND vs SL ODI Series
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहेत.  File Photo
स्पोर्ट्स

IND vs SL ODI Series : गंभीरची विनंती अन् रोहित-विराट राजी! दोघेही श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli Rohit Sharma IND vs SL ODI Series : रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसणार आहेत. याबाबत दोघांनीही बीसीसीआयला कळवले आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आवाहन केल्यानंतर दोघही खेळणार असल्याचे समोर आले आहे.

गेली सहा महिने सतत्याने क्रिकेट खेळल्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाईल अशी चर्चा होती. आता त्या चर्चेवर पडदा पडला आहे. प्रथम रोहितने आणि आता विराटनेही वनडे मालिकेत खेळण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, बुमराह दोन्ही मालिकांमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कामाचा ताण लक्षात घेता त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी अपडेट समोर आली आहे.

रोहित-विराटची टी-20 मधून निवृत्ती

भारताने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली जाहीर केली. या दोघांशिवाय स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजानेही टी-20 इंटरनॅशनलला अलविदा केला. मात्र, रोहित आणि विराट हे एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहेत. (Virat Kohli Rohit Sharma IND vs SL ODI Series)

टीम इंडियाची आज घोषणा?

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्यासह निवड बैठकीचा भाग असतील. वृत्तानुसार, श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सूर्यकुमार यादवकडे टीम इंडियाची धुरा सोपवली जाऊ शकते. त्याच्या नेतृत्वाखाली हार्दिक पंड्या खेळेल. पण पंड्या वैयक्तिक कारणामुळे वनडे मालिकेत खेळणार नसल्याचे समोर आले असून त्याने बोर्डाकडे विश्रांतीची मागणी केल्याचे समजते आहे. (Virat Kohli Rohit Sharma IND vs SL ODI Series)

रियान परागला मिळणार संधी?

वृत्तानुसार, रियान परागने भारतीय संघाच्या मधल्या फळीतील स्थानासाठी दावा ठोकला आहे. त्याची वनडे आणि टी-20 संघातही निवड होण्याची शक्यता आहे. निवड समिती भविष्यासाठी नवीन चेहरे आजमावत असून परागला गोलंदाजी करता येत असल्याने त्याला दोन्ही संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. परागचा वनडे संघात समावेश झाल्यास सूर्यकुमारला तिथून बाहेर पडावे लागण्याची शक्यता आहे.

रिंकू फक्त टी-20 खेळेल

भारताने शेवटची वनडे मालिका दक्षिण आफ्रिकेत खेळली. त्या मालिकेत रिंकू सिंगला संधी मिळाली. पण श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला स्थान मिळेल असे वाटत नाही. पण तो टी-20 संघात नक्कीच असेल. यासह केंद्रीय करारातून बाहेर पडल्यानंतर श्रेयस अय्यर पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये दिसेल. एकदिवसीय संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक असलेल्या अय्यरला या फॉरमॅटमध्येच संधी मिळेल असे दिसते.

टीम इंडियाच्या विजयीरथाची घोडदौड सुरूच आहे. टी-20 विश्वचषकानंतर युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धची मालिका 4-1 ने जिंकली. आता भारताचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. उभय संघांमध्ये टी-20 आणि वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. प्रथम एकदिवसीय मालिका खेळली जाईल, ज्याबद्दल बरीच चर्चा आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SCROLL FOR NEXT