rohit sharma retirement sachin tendulkar instagram post
मुंबई : भारतीय क्रिकेटचा हिटमॅन रोहित शर्मा याने बुधवारी (दि. 7) अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीच्य माध्यमातून याची घोषणा केली. रोहितच्या या निर्णयानंतर संपूर्ण क्रिकेटविश्व भावुक झालं. अशातच क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणा-या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने रोहितच्या पदार्पणाच्या कसोटीशी संबंधित आठवणी शेअर केल्या आहेत. लिटिल मास्टरनेच रोहितला त्याची कसोटी पदार्पणाची कॅप दिली होती. ही सचिनची निवृत्ती मालिका होती.
सचिनने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘मला आठवतंय, 2013 साली ईडन गार्डन्समध्ये मीच तुला तुझी टेस्ट कॅप दिली होती. त्यानंतर एक दिवस वानखेडे स्टेडियमच्या बाल्कनीत आपण दोघं एकत्र उभे होतो. तुझा प्रवास अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी राहिला आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत, एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून तू भारतीय क्रिकेटसाठी नेहमीच तुझं सर्वोत्तम दिलं आहेस. तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!’
रोहित शर्माने 6 नोव्हेंबर 2013 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याला पदार्पणाची कॅप खुद्द सचिन तेंडुलकरने दिली. ही सचिनच्या कारकिर्दीतील शेवटची मालिका होती. रोहितने आपल्या पहिल्याच टेस्ट सामन्यात 177 धावांची अविस्मरणीय खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर या मालिकेतील दुसऱ्या टेस्ट सामन्यातही रोहितने 111 धावांची शानदार खेळी केली. हा सामना तेंडुलकरचा निरोपाचा सामना होता. पदार्पण मालिकेतील जबरदस्त कामगिरीसाठी रोहित शर्माला प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्काराने गौरविण्यात आलं.
दरम्यान, काल बुधवारी (दि. 7) इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार दावा करण्यात आला की टीम इंडियाची निवड समिती रोहित शर्माला टेस्ट कर्णधारपदावरून हटवण्याच्या विचारात आहे. सायंकाळी सुमारे 6.30 वाजता ही बातमी समोर आली. यानंतर तासाभरातच रोहित शर्माने आपली निवृत्ती जाहीर केली.
हिटमॅनने चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले. त्याने नम्रतेने म्हटलं की, टेस्ट क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळणं ही त्याच्यासाठी गौरवाची गोष्ट होती. तसेच, तो अद्याप वनडे क्रिकेट खेळत राहील, असेही त्याने स्पष्ट केले.