मुंबई : आयपीएल २०२६ (IPL 2026) च्या थराराला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना, मुंबई इंडियन्सने आयोजित केलेल्या एका दिमाखदार फॅन इव्हेंटमध्ये माजी कर्णधार रोहित शर्माने केलेल्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या या दिलखुलास अंदाजाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या १९ व्या हंगामाचा बिगुल २८ मार्च रोजी वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व १० संघांनी आपापल्या सराव शिबिरांना सुरुवात केली आहे. दरम्यान, पाच वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने २१ मार्चच्या संध्याकाळी चाहत्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्यात संघातील जवळपास सर्वच खेळाडू उपस्थित होते, मात्र सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या त्या लाडक्या 'हिटमॅन'वर. रोहित शर्मा आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमात सहभागी झाला होता, जिथे तो लेक समायरासोबत खेळतानाही दिसला.
या कार्यक्रमात प्रसिद्ध रॅपर 'डिवाइन' याने आपल्या सादरीकरणाने रंगत आणली. डिवाइनचे लोकप्रिय गाणे ‘एक खोका, दोन खोका चार खोका’ सुरू होताच रोहित शर्माला आपला मोह आवरता आला नाही. सुरुवातीला लेक समायराला कडेवर घेतलेल्या रोहितने गाण्याचा ताल धरताच तिला तिलक वर्माकडे सोपवले आणि स्वतः गाण्याच्या तालावर पूर्णपणे रंगून गेला. रोहितचा हा बेभान डान्स पाहून उपस्थित चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
गेल्या हंगामात (IPL 2025) रोहित शर्माला अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. अनेक सामन्यांत तो 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून मैदानात उतरला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्सला सहाव्यांदा जेतेपदावर नाव कोरायचे असेल, तर रोहितचा फॉर्म संघासाठी अत्यंत कळीचा ठरणार आहे.
मुंबई इंडियन्स आपल्या मोहिमेची सुरुवात २९ मार्च रोजी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर करणार आहे. पहिल्याच लढतीत त्यांच्यासमोर कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान असेल. गेल्या हंगामात मुंबईचा प्रवास दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध पराभूत झाल्याने थांबला होता; यंदा मात्र तो कसर भरून काढण्यासाठी संघ सज्ज आहे.