स्पोर्ट्स

Rohit Sharma Retirement : हिटमॅननंतर जैस्वालचा कसोटी सलामी जोडीदार कोण? शर्यतीत ‘या’ फलंदाजांचे नाव आघाडीवर

रोहित शर्माची गणना भारताच्या सर्वात यशस्वी सलामीवीरांमध्ये होते. त्याने कसोटी सामन्यांमध्ये भारतासाठी अनेक संस्मरणीय खेळी केल्या आहेत. निवृत्तीनंतर त्याच्या जागी यशस्वी जैस्वालसोबत कोण सलामीला येईल?

रणजित गायकवाड

rohit sharma retirement who is new opening batsman with yashasvi jaiswal

मुंबई : भारताचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माने बुधवारी (दि. 7) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून ही माहिती दिली आहे. रोहितच्या या घोषणेनंतर, त्याच्या जागी कसोटी संघात सलामीची जबाबदारी कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोहितची गणना भारताच्या यशस्वी कसोटी सलामीवीरांमध्ये होते. तथापि, गेल्या काही मालिकांमध्ये त्याची फलंदाजी रेकॉर्ड चांगले राहिले नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली पण तो पुन्हा सलामीला आला. कसोटी संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालसोबतच्या त्याच्या जोडीने अल्पावधीतच चांगले यश मिळवून दिले, पण आता जैस्वालला एक नवीन जोडीदार मिळणार आहे. हा खेळाडू कोण असू शकतो, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

टीम इंडियाचा नवीन कसोटी सलामीवीर कोण?

केएल राहुल

या शर्यतीत केएल राहुल आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, रोहितच्या अनुपस्थितीत त्याने पहिल्या कसोटी सामन्यात सलामी दिली. त्याची आणि यशस्वीची जोडी प्रभावित ठरली होती. राहुलने शानदार खेळी केली होती आणि त्यामुळे रोहितला पुढच्या कसोटी सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. राहुल हा कसोटी सलामीवीर आहे, पण रोहितमुळे त्याला मधल्या फळीत खेळावे लागत होते. तथापि, आता राहुल सलामीला मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.

शुभमन गिल

शुभमन गिल हे देखील एक स्टार फलंदाज आहे जो रोहितची सलामीची जागा घेऊ शकतो. पूर्वी तो हिटमॅनच्या साथीने कसोटीत सलामीला यायचा, पण डवखु-या जैयस्वालमुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळावे लागले. गिलला डावाची सुरुवात करण्याची आणखी एक संधी मिळाली तर आश्चर्य वाटणार नाही.

ऋतुराज गायकवाड

ज्या नावाची खूप चर्चा झाली आहे आणि कसोटी क्रिकेटसाठी योग्य मानले जाते ते म्हणजे ऋतुराज गायकवाड. गायकवाडच्या तंत्राचे अनेकांनी कौतुक केले आहे आणि म्हणूनच त्याला पुन्हा पुन्हा कसोटी संघात आणण्याची चर्चा होत आहे. गायकवाड हा सलामीवीर आहे. त्याच्यावर निवडकर्त्यांची नजर आहे. जर निवड समितीला नवीन खेळाडूला संधी द्यायची असेल तर गायकवाडचे नावही या शर्यतीत समाविष्ट असेल.

साई सुदर्शन

आयपीएल-2025 मध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घालणाऱ्या साई सुदर्शनच्या दर्जेदार फलंदाजीचे अनेक दिग्गज चाहते बनले आहेत. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तर आगामी इंग्लंड दौऱ्यावर त्यांना संघात स्थान मिळायला हवे असे म्हटले होते. सुदर्शनने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. यादरम्यान शतकही झळकावले आहे. त्याला कसोटी फलंदाज मानले जाते आणि रोहित शर्माची जागा घेण्याच्या शर्यतीत त्याचे नाव देखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT