गुवाहाटी : जेव्हा आव्हान महाप्रचंड असते आणि चाहत्यांच्या अपेक्षा शिगेला पोहोचलेल्या असतात, तेव्हा मैदानात अवतरतो तो फलंदाज म्हणजे ‘हिटमॅन’ रोहित शर्मा. गुवाहाटीच्या मैदानावर वेस्टइंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत रोहितने आपल्या नेहमीच्या आक्रमक आणि दिमाखदार शैलीत फलंदाजी करत टीकाकारांची तोंडे बंद केली. आपल्या बॅटमधून निघणाऱ्या फटक्यांनी त्याने स्पष्ट संदेश दिला की, वय हा केवळ एक आकडा असून खेळातला दर्जा आजही अबाधित आहे. ४०६ धावांच्या अवाढव्य लक्षाचा पाठलाग करताना रोहितने कैरेबियन गोलंदाजीची पिसं काढत अनेक ऐतिहासिक विक्रमांना गवसणी घातली.
एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या रोहित शर्माने कीमो पॉलच्या चेंडूवर गगनचुंबी षटकार खेचताच क्रिकेटच्या इतिहासात एका नव्या पानाची नोंद झाली. एकाच देशाच्या भूमीवर २०० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय षटकार ठोकणारा रोहित हा जगातील एकमेव आणि पहिलाच फलंदाज ठरला आहे. या सामन्यात अवघ्या ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करणाऱ्या रोहितने आपल्या खेळीदरम्यान ४ उत्तुंग षटकार लगावून भारतीय मैदानांवर षटकारांचे हे अनोखे द्विशतक साजरे केले.
काही ठरावीक देशांविरुद्ध मोठ्या खेळी साकारणे आणि प्रचंड षटकार ठोकणे ही रोहितची खासियत मानली जाते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक ९३ षटकार ठोकण्याचा विक्रम आधीपासूनच त्याच्या नावावर आहे. आता या यादीत वेस्टइंडिजचाही समावेश झाला असून, त्याने कॅरेबियन संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये तब्बल ४३ षटकार ठोकले आहेत. वेस्टइंडिजविरुद्ध कोणत्याही फलंदाजाने मारलेली ही सर्वाधिक षटकारांची संख्या आहे. पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर रोहितकडूनही अशाच मोठ्या खेळीची अपेक्षा होती, ती त्याने गुवाहाटीत सार्थ ठरवली.
पहिल्या सामन्यातील अपयश धुडकावून लावत रोहितने गुवाहाटीत ७३ धावा करताच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२,००० धावांचा टप्पा ओलांडला. या विक्रमासह तो १२ हजार धावा पूर्ण करणारा जगातील अवघा सातवा, तर सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यानंतरचा तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. डावाच्या सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर त्याने गिअर बदलत चौफेर फटकेबाजी केली आणि हा ऐतिहासिक पल्ला गाठला.
सचिन तेंडुलकर (भारत) – १८,४२६ धावा
विराट कोहली (भारत) – १५,०८० धावा
कुमार संगकारा (श्रीलंका) – १४,२३४ धावा
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – १३,७०४ धावा
सनथ जयसूर्या (श्रीलंका) – १३,४३० धावा
महेला जयवर्धने (श्रीलंका) – १२,६५० धावा
रोहित शर्मा (भारत) – १२,००० धावा