लंडन; वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड यांच्यात १९ जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर होणारा तिसरा आणि अंतिम वन डे सामना हा भारताचा दिग्गज सलामीवीर रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरण्याची दाट शक्यता आहे. एका वृत्तानुसार, बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने रोहित शर्माला थांबण्याचे संकेत दिले असून, आगामी काळात युवा खेळाडूंना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या उपस्थितीत निवड समितीने गेल्या आठवड्यात रोहितशी चर्चा करून भविष्यातील योजना स्पष्ट केल्याचे समजते.
निवड समिती २०२७ च्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी आतापासूनच संघ तयार करत आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता त्यांच्या भविष्यातील योजनांचा भाग नसेल, हे स्पष्ट झाले आहे. ‘निवड समितीने रोहितला त्यांच्या या निर्णयाची कल्पना दिली आहे. रोहितला स्वतःला खेळ चालू ठेवायचा होता, विशेषतः त्याने आपल्या फिटनेसवर खूप मेहनत घेतली होती. मात्र, निवड समितीने आता चेंडू रोहितच्या कोर्टात टाकला असून, भविष्यातील निवृत्तीचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्याला दिले आहे,’ अशी माहिती बीसीसीआयच्या एका सूत्राने दिली. या निर्णयावर रोहित नाराज असल्याचीही चर्चा आहे.
युवा खेळाडूंना मिळणार संधी; गिलकडे नेतृत्व
रोहित शर्माने यापूर्वीच २९ जून २०२४ रोजी भारताला टी-२० विश्वचषक जिंकून दिल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर ७ मे २०२५ रोजी त्याने कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला होता. कसोटीतून निवृत्त झाल्यानंतर, निवड समितीने भारतीय क्रिकेटचे भविष्य लक्षात घेऊन यशस्वी जैस्वालसारख्या युवा खेळाडूंना संघात स्थान देण्याचे ठरवले आहे, ज्यांना शतके ठोकूनही अनेकदा बेंचवर बसावे लागले होते. तसेच, निवड समितीने गेल्या वर्षीच रोहितकडून एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद काढून घेत ते युवा फलंदाज शुभमन गिलकडे सोपवले आहे.
कर्णधार म्हणून सुवर्णकाळ आता फॉर्मची चिंता
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने भारताच्या खेळण्याची पद्धत बदलून टाकली होती. हीच आक्रमक शैली २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजयातही पाहायला मिळाली. मात्र, सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावर रोहितला धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे.