पुढारी ऑनलाईन डेस्क : वन-डे विश्वचषक स्पर्धा २०२३ नंतर स्पर्धेत घोट्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियात खेळणार का, याबाबत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit sharma) मोठी अपडेट दिली आहे.
सराव करताना मोहम्मद शमी याला पुन्हा दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र यावेळी रोहित शर्माने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती चुकीची असल्याचे म्हटले होते. मात्र आता आता स्वतः कर्णधार रोहित शर्माने शमीच्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे म्हटलं आहे.
रोहित शर्माने बंगळूरु कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले की, “प्रामाणिकपणे सांगायचे तर ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी मोहम्म शमी याला बोलावणे कठीण आहे. वनडे विश्वचषक स्पर्धेवेळी त्याला दुखापत झाली होती. त्याच्या गुडघ्याला सूज आली होती. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) डॉक्टर आणि फिजिओचे मार्गदर्शन घेत आहे. पूर्ण फीट असल्याशिवाय आम्ही मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत खेळवणार नाही."
वनडे विश्वचषक अंतिम सामना नोव्हेंबर २०२३ मध्ये झाला. तेव्हापासून शमी खेळलेला नाही. या स्पर्धेत तो दुखापतीसह खेळला; पण नंतर त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली होती.डिसेंबर 2023 मध्ये भारताच्या दक्षिण आफ्रिकेच्या दोन कसोटी सामन्यांच्या दौऱ्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने शमीला या दौऱ्यासाठी मंजुरी दिली नाही. काही दिवसांपूर्वी मोहम्म शमी नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला असला तरी तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. तो तंदुरुस्त होण्यासाठी पुनर्वसनाच्या प्रक्रियेतून जात होता आणि काही दिवसांत पूर्ण तंदुरुस्ती प्राप्त करणार होता, परंतु यादरम्यान त्याच्या गुडघ्याला सूज आली. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला सुमारे दोन महिने लागू शकतात. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सर्व सामन्यांसाठी तो उपलब्ध असणार नाही, हे आता स्पष्ट झालेआहे.
शमीने भारतासाठी ६४ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने २७.७१ उत्कृष्ट सरासरीने २२९विकेट घेतल्या आहेत. 22 नोव्हेंबरपासून भारत ऑस्ट्रेलियात पाच कसोटी सामने खेळणार आहे.