रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा फलंदाजीत मोठी खेळी करू शकला नाही. हिटमॅन अवघ्या १४ धावा करून तंबूत परतला. मात्र, या छोट्याशा खेळीतही त्याने एक भव्य विक्रम आपल्या नावावर केला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या भूमीवर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडला मागे टाकले. यासह रोहितचे नाव आता इतिहासात कोरले गेले आहे.
रायपूरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, भारतीय संघाने सलग २०व्यांदा टॉस गमावण्याची 'अनोखी' नोंद झाली आहे. फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी धडाकेबाज पद्धतीने केली.
पहिल्या चार षटकांत रोहितला फक्त ३ चेंडू खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने २ धावा केल्या होत्या. पण, पाचव्या षटकात वेगवान गोलंदाज नंद्रे बर्गरला (Nandre Burger) त्याने सलग तीन खणखणीत चौके लगावले आणि इतिहास रचला. या चौकारांच्या मदतीने रोहित शर्माने मायदेशातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ९,००० धावा पूर्ण केल्या. या विक्रमासाठी त्याला फक्त ९ धावांची गरज होती आणि त्याने केवळ १४ धावांची खेळी करून हा टप्पा यशस्वीरित्या गाठला.
रोहित शर्मा घरच्या मैदानावर ९,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनी हा पराक्रम केला होता.
सलग तिसरा चौकार मारताच, रोहितने राहुल द्रविडचा विक्रम मोडला. द्रविडच्या ९,००४ धावांचा टप्पा पार करून रोहित शर्मा आता भारतीय भूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे.
सचिन तेंडुलकर : १४,१९२ धावा
विराट कोहली : १२,३७३
रोहित शर्मा : ९,००५
राहुल द्रविड : ९,००४
रोहित शर्मा चौकारांची हॅटट्रिक मारून उत्तम लयीत दिसत होता, परंतु नंद्रे बर्गरच्या त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर तो झेलबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याची खेळी १४ धावांवर संपुष्टात आली असली तरी, त्याने रचलेला हा विक्रम क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील.