इंदूर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि 'सुपरस्टार' फलंदाज रोहित शर्माने इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानात पाऊल ठेवताच एक ऐतिहासिक 'शतक' साजरे केले आहे. या कामगिरीसह रोहितने सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांसारख्या महान खेळाडूंचा समावेश असलेल्या एका विशेष क्लबमध्ये प्रवेश केला आहे.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माची गणना जगातील महान खेळाडूंमध्ये केली जाते. इंदूरचा हा एकदिवसीय सामना रोहितच्या कारकिर्दीतील भारतीय भूमीवर खेळला जाणारा १०० वा सामना ठरला. मायदेशात १०० एकदिवसीय सामने खेळणारा रोहित हा केवळ सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा बहुमान सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, युवराज सिंग, एम.एस. धोनी आणि विराट कोहली यांनी मिळवला होता.
सचिन तेंडुलकर: १६४ सामने
विराट कोहली: १३० सामने
एम.एस. धोनी: १२७ सामने
मोहम्मद अझरुद्दीन: ११३ सामने
युवराज सिंग: १०८ सामने
रोहित शर्मा: १०० सामने
भारतात खेळल्या गेलेल्या १०० सामन्यांतील ९९ डावांमध्ये रोहितने ५५.७५ च्या सरासरीने एकूण ५०७४ धावा कुटल्या आहेत. यात त्याने १४ शतके आणि २४ अर्धशतके झळकावून घरच्या प्रेक्षकांचे मनमुराद मनोरंजन केले आहे.
२०२५ च्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत रोहितने धावांचा पाऊस पाडला होता. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या या मालिकेत त्याची जादू चालली नाही. या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याला २०.३३ च्या सरासरीने केवळ ६१ धावाच करता आल्या. निर्णायक सामन्यातही तो स्वस्तात बाद झाल्याने चाहत्यांचा काहीसा हिरमोड झाला.