मुंबई; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या दमदार फलंदाजीसोबतच आलिशान कार कलेक्शनसाठीही ओळखला जातो. आता त्याच्या ताफ्यात एका नव्या लाल रंगाच्या ‘लॅम्बोर्गिनी उरूस’ची भर पडली आहे. या गाडीची किंमत तब्बल 4.57 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात असून, या नव्या कारचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या नव्या गाडीची सर्वात मोठी खासियत म्हणजे, तिचा नंबर प्लेट. रोहितने नेहमीप्रमाणेच गाडीसाठी एक खास क्रमांक निवडला आहे, ज्याचा त्याच्या कुटुंबाशी भावनिक संबंध आहे. गाडीचा क्रमांक ‘3015’ असा आहे. रोहितची मुलगी समायरा हिचा जन्म 30 नोव्हेंबरला, तर मुलगा अहान याचा जन्म 15 नोव्हेंबरला झाला आहे. या दोन्ही तारखा एकत्र करून हा खास क्रमांक तयार करण्यात आला आहे.
यापूर्वी रोहितच्या गाडीचा क्रमांक त्याच्या वन-डेतील सर्वोच्च धावसंख्येवरून ‘264’ असा होता. विशेष म्हणजे, त्याच्या जर्सी क्रमांक ‘45’ शीही या नव्या नंबरचा एक वेगळाच योगायोग जोडला जात आहे. ही गाडी केवळ दिसायलाच आकर्षक नाही, तर वेगाच्या बाबतीतही जबरदस्त आहे. ती फक्त 3.4 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग पकडू शकते. रोहितच्या गॅरेजमध्ये या लॅम्बोर्गिनीशिवाय बीएमडब्ल्यू एम5, मर्सिडीज-बेंझ जीएलएस 400डी आणि रेंज रोव्हर यासारख्या अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.