स्पोर्ट्स

Rohit Sharma Test cricket Retirement : रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती! इन्स्टाग्रावर शेअर केली भावनिक स्टोरी

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे आता त्याच्या या फॉरमॅटमधील भविष्याबद्दल शक्यता पूर्णविराम मिळाला आहे.

रणजित गायकवाड

Rohit Sharma announces retirement from Test cricket

मुंबई : रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. हिटमॅनने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली. रोहितने अचानक निवृत्ती घेतल्याने इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. संघासह चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे.

आयपीएल 2025 नंतर, भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल. या काळात दोन्ही संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ही कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ या मालिकेसह नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद चक्राची सुरुवात देखील करेल.

रोहितने इंस्टाग्रामवर लिहिले, ‘मला माझ्या सर्व चाहत्यांना सांगायचे आहे की आज मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. आपल्या देशासाठी सफेद रंगाच्या जर्सीत खेळणे आणि देशाचे प्रतिनिधित्व करणे हा बहुमान मला मिळाला. इतके वर्ष मला दिलेल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. मी एकदिवसीय फॉरमॅटमध्ये देशाचे नेतृत्व करत राहणार आहे’, असे हिटमॅनने शेअर केले आहे. त्याने कसोटी क्रिकेटसाठी वापरल्या जाणाऱ्या निळ्या रंगाच्या टोपीचा फोटो शेअर करत त्यावर हा मजकूर लिहला आहे.

मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानंतर आता रोहितने टेस्ट क्रिकेटलाही अलविदा केले आहे, त्यामुळे हिटमॅन आता फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे.

रोहित शर्माची कसोटी कारकीर्द

रोहित शर्मा याने 6 नोव्हेंबर 2013 रोजी कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. रोहितने तेव्हापासून गेली 12 कसोटी संघांचे प्रतिनिधित्व केले. तसेच रोहितने या दरम्यान काही वर्ष भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली.

4,302 धावा

रोहितने 67 कसोटी सामन्यांमधील 116 डावांमध्ये 57.08 या स्ट्राईक रेटने आणि 40.58 च्या सरासरीने 4,302 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 88 षटकार आणि 473 चौकार लगावले. रोहितने 12 वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत 18 अर्धशतकं, 12 शतकं आणि 1 द्विशतक झळकावले. रोहितची 212 ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे.

रोहितची कसोटी कर्णधार म्हणून कामगिरी

रोहितने 2022-2024 दरम्यान एकूण 24 सामन्यांमध्ये भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले. रोहितने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात 24 पैकी 12 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. तर 9 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर 3 सामने अनिर्णित राहिले. रोहितची कर्णधार म्हणून 57.14 अशी विजयी टक्केवारी राहिली.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचं उपविजेतेपद

रोहितने टीम इंडियाला त्याच्या नेतृत्वात 2021-2023 या वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीप स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवून दिले होते. भारताला या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT