ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेची सर्वात खराब सुरुवात
पण सिडनी वनडेतून रोहित-विराटचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
दोघांच्या खेळीमुळे टीम इंडियाने मालिकेत व्हाईटवॉश होणे टाळले
भारताचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी शनिवारी (दि. २५) सिडनीमध्ये दमदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी ऑस्ट्रेलिया दौरा संपल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीवर पडदा पडेल अशा चर्चा करणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. या दोघांनी पर्थ येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अनुक्रमे ८ आणि ० धावांवर विकेट गमावल्याने मालिकेची सर्वात खराब सुरुवात केली होती.
कोहली तर पुढील सामन्यातही शून्यावर बाद झाला. परंतु त्यानंतर सिडनीमध्ये रोहितसह त्याने मॅच विनिंग खेळी साकारली. त्याने नाबाद ७४ धावा फटकावल्या. दुसरीकडे, रोहितला दुस-या सामन्यापासून लय मिळाली. त्या सामन्यात त्याने ७३ धावा केल्या तर तिस-या सामन्यात नाबाद १२१ धावा तडकावल्या. अंतिम सामन्यातील त्यांच्या या खेळीमुळे टीम इंडियाने मालिकेत व्हाईटवॉश होणे टाळले.
सामन्यानंतर कोहली आणि रोहित यांनी रवी शास्त्री आणि ॲडम गिलख्रिस्ट यांच्याशी संवाद साधला आणि आपण लवकरच निवृत्ती जाहीर करणार नसल्याचे स्पष्ट केले. ते २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकातही खेळण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. क्रिकेटप्रेमींना आता या जोडीला एका महिन्यानंतर, ३० नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा मैदानात पाहता येईल. ही मालिका द. आफ्रिकेविरुद्ध असून भारतात खेळवली जाणार आहे.
सामनावीर आणि मालिकावीर अशा दोन्ही पुरस्कारांवर मोहोर उमटवणाऱ्या कर्णधार रोहित शर्माने आव्हानात्मक ऑस्ट्रेलियन भूमीवर महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सर्व संघातील खेळाडूंचे अभिनंदन केले. ‘ऑस्ट्रेलियातील परिस्थिती कोणत्याही खेळाडूचे मनोबल आणि अनुकूलनक्षमता यांची कसोटी पाहणारी असते’, असे त्याने व्यक्त केले.
रोहितने पुढे स्पष्ट केले की, जरी भारतीय संघास मालिकेत विजय मिळवता आला नसला, तरी संघासाठी अनेक सकारात्मक पैलू पुढे घेऊन जाता येतील; विशेषतः युवा खेळाडूंना मिळालेला अमूल्य अनुभव हा त्यापैकीच एक आहे. विश्रांतीनंतर खेळलेले हे सामने उत्कृष्ट तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरले आणि यातून मला लय आणि आत्मविश्वास पुन्हा मिळबण्यास मदत झाली, असे त्याने सांगितले.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मासोबतची विजयी भागीदारी साकारल्यानंतर विराट कोहलीने मनोगत व्यक्त केले. तो म्हणाला, आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक वर्षे खेळूनही, कठीण परिस्थितीत खेळणे मला आजही आव्हान देते. या आव्हानांमुळेच मला सातत्याने प्रेरणा मिळत राहते. अशा दडपणाखालीच सर्वोत्तम कामगिरी अधिक प्रभावीपणे समोर येते, असे त्याने स्पष्ट केले.
रोहित शर्मा सोबतच्या भागिदारी बद्दल बोलताना किंग कोहली म्हणाला, रोहितसोबत फलंदाजी करणे नेहमीच अत्यंत सहज वाटते. गेल्या दहा वर्षांपासून आम्ही एकत्र खेळत आहे. त्यामुळे आमच्यात उत्कृष्ट समन्वय आहे. या भागीदारीची सुरुवात २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्याच एकदिवसीय मालिकेत झाली होती. हा प्रवास आजपपर्यंत सुरू आहे. दडपणाखाली सिडनीती वनडे सामन्यातही आमची 'केमिस्ट्री' पुन्हा एकदा यशस्वी ठरली याबद्दल समाधान आहे,’ अशी भावना त्याने व्यक्त केली.
विराटने यावेळी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या उर्जेची आणि कौतुकाची प्रशंसा केली. भारत नेहमीच ऑस्ट्रेलियात सर्वोत्तम क्रिकेट खेळतो, असे मत त्याने मांडले. हे सामने खेळाडू आणि चाहत्यांसाठी कायमच अविस्मरणीय ठरतात, असे कोहलीने शेवटी नमूद केले.