Rohit Sharma
नवी दिल्ली : पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने एक इतिहास रचला आहे. या सामन्यासह रोहितने आपल्या कारकिर्दीतील ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत भारतीय क्रिकेट इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे.
रोहित शर्मा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा भारताचा पाचवा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर (६६४), विराट कोहली (५५१), एम एस धोनी (५३५) आणि राहुल द्रविड (५०४) यांनी ही कामगिरी केली आहे.
रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय प्रवास खूपच अविस्मरणीय राहिला आहे. २००७ मध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या या धुरंधर फलंदाजाने आतापर्यंत भारतीय क्रिकेटला अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर तीन द्विशतके आहेत, जी कोणत्याही फलंदाजासाठी दुर्लभ अशी कामगिरी आहे.
५०० वा आंतरराष्ट्रीय सामना अपयशी
या सामन्यात भारताला रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. रोहित २२४ दिवसांनंतर मैदानात परतला, पण तो फक्त १६ मिनिटे क्रीजवर टिकला. तो जोश हेझलवूडच्या चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. रोहित त्याचा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता, पण तो संस्मरणीय बनवण्यात अपयशी ठरला, त्याने १४ चेंडूत एका चौकारासह आठ धावा केल्या.