Roger Federer | रॉजर फेडररचा ‘हॉल ऑफ फेम’मध्‍ये सन्मान 
स्पोर्ट्स

Roger Federer | रॉजर फेडररचा ‘हॉल ऑफ फेम’मध्‍ये सन्मान

२० वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्यावर कौतुकाचा वर्षाव

पुढारी वृत्तसेवा

न्यू ऑर्लिन्स (अमेरिका); वृत्तसंस्‍था : टेनिस जगतातील महान खेळाडू आणि २० ग्रँडस्लॅम जेतेपदांचा मानकरी ठरलेला स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याचा अमेरिकेतील न्यूपोर्ट येथे ‘आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे. टेनिस विश्वातील हा सर्वोच्च सन्मान स्वीकारताना फेडरर अत्यंत भावुक झाला होता. या प्रतिष्ठित व्यासपीठावर फेडररसोबतच ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आणि समालोचक मेरी कॅरिलो यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करून गौरव करण्यात आला.

आपल्या कारकिर्दीत तब्बल ३१० आठवडे जागतिक क्रमवारीत अग्रस्थान भूषवणाऱ्या आणि १०३ एटीपी जेतेपदे पटकावणाऱ्या ४५ वर्षीय फेडररच्या शिरपेचात या सन्मानाने मानाचा तुरा रोवला गेला आहे. फेडररने आपल्या कारकिर्दीत विक्रमी ८ विम्बल्डन, ६ ऑस्ट्रेलियन ओपन, ५ यूएस ओपन आणि १ फ्रेंच ओपन अशी २० ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकून टेनिस जगतावर अधिराज्य गाजवले. २०२२ मध्ये व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त झालेल्या या खेळाडूला हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन्मान स्वीकारल्यानंतर फेडरर म्हणाला, ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अभिमानास्पद क्षण आहे. प्रसिद्धी मिळवणे हे माझे ध्येय कधीच नव्हते, तर मला मनापासून आवडणाऱ्या खेळासाठी आयुष्य वेचणे हेच माझे स्वप्न होते.’ यावेळी त्याने पत्नी मिर्का, कुटुंबीय, प्रशिक्षक आणि डॉक्टर यांचे आभार मानले. ‘टेनिसमधील माझी इनिंग संपली असली, तरी खेळावरील माझे प्रेम कधीच कमी होणार नाही, हे माझे खेळाला दिलेले प्रेम कायम सुरू राहील’, असा विश्वास त्याने व्यक्त केला. या ऐतिहासिक क्षणी जगभरातील क्रीडाप्रेमींनी फेडररवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

कारकिर्दीवर दृष्‍टिक्षेप

एटीपी जेतेपदे : १०३

जागतिक क्रमवारीत अव्‍वलस्‍थान : ३१० आठवडे

रॉजर फेडररची २० ग्रँडस्‍लॅम जेतेपदे

विम्‍बल्‍डन : 8

ऑस्‍ट्रेलियन : 6

अमेरिकन : 5

फ्रेंच : 1

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT