पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा या वर्षीचा हंगाम दोन दिवसांत सुरु होणार आहे. तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सने त्यांच्या कर्णधाराबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांचा नियमित कर्णधार संजू सॅमसन याच्या बोटाची दुखापत पूर्ण बरी होईपर्यंत, युवा अष्टपैलू खेळाडू रियान पराग संघाचे नेतृत्व करणार आहे. यादरम्यान सॅमसन विशेष फलंदाज म्हणून संघात सहभागी होणार असल्याची माहितीही राजस्थान रॉयल्सने त्यांच्या एक्स अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत दिली आहे.
सॅमसनने संघाच्या अधिकृत X हँडलवरून व्हिडिओद्वारे ही घोषणा केली आहे की, "मी पुढील तीन सामन्यांसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही. संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. पुढील तीन सामन्यांसाठी रियान संघाचे नेतृत्व करणार आहे. तो हे करण्यास सक्षम आहे, आणि मला अपेक्षा आहे की सर्वजण त्याला पाठिंबा देतील."
राजस्थान रॉयल्सने जाहीर केले आहे की, आयपीएल २०२५ च्या पहिल्या तीन सामन्यांसाठी रियान पराग संघाचे नेतृत्व करेल. हा युवा अष्टपैलू खेळाडू २३ मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या पहिल्या सामन्यात, त्यानंतर २६ मार्च रोजी गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आणि ३० मार्च रोजी घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यात संघाचे नेतृत्व करेल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
रियान परागने अलीकडील हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. IPL 2024 मध्ये, त्याने 52.09 च्या सरासरीने आणि 149.21 च्या स्ट्राइक रेटने 573 धावा केल्या, ज्यात चार अर्धशतके आणि सर्वोत्तम स्कोअर 84* होता. त्याच्या नेतृत्वाखाली, राजस्थान रॉयल्सने IPL 2025 च्या सुरुवातीसाठी चांगली तयारी केली आहे.