स्पोर्ट्स

Rishabh Pant Century : ऋषभ पंतचा इंग्लंडवर ‘डबल’ प्रहार! एकाच कसोटीत दोन शतके झळकावून विश्वविक्रमाला गवसणी

ऋषभ पंत आता जगातील पहिला असा यष्टीरक्षक-फलंदाज बनला आहे, ज्याने परदेशात खेळताना कोणत्याही देशाविरुद्ध एकाच कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावले आहे.

रणजित गायकवाड

ऋषभ पंतने इंग्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऋषभ पंतने पहिल्या डावात शतक झळकावले आणि त्यानंतर दुसऱ्या डावातही आपले दुसरे शतक पूर्ण केले. जरी जगातील अनेक फलंदाज अशी कामगिरी करत असले, तरी ऋषभ पंतने केलेला हा पराक्रम अद्वितीय आहे. ज्याप्रमाणे त्याची फलंदाजीची शैली इतरांपेक्षा वेगळी आहे, त्याचप्रमाणे त्याचे विक्रमही अनोखे ठरतात. चला, जाणून घेऊया पंतने कोणती नवीन कामगिरी केली आहे.

परदेशात एकाच कसोटीच्या दोन्ही डावांत शतक

ऋषभ पंत आता जगातील पहिला असा यष्टीरक्षक-फलंदाज बनला आहे, ज्याने परदेशात खेळताना कोणत्याही देशाविरुद्ध एकाच कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावले आहे. अशी कामगिरी आजपर्यंत जगातील कोणत्याही यष्टीरक्षकाला कसोटी क्रिकेटमध्ये करता आलेली नाही. ही तर परदेशातील कामगिरी झाली, पण मायदेशातही अशी घटना केवळ एकदाच घडली आहे. २००१ मध्ये, झिम्बाब्वेच्या अँडी फ्लॉवरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एका कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतके केली होती. पहिल्या डावात त्यांनी १४२ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात नाबाद १९९ धावांची खेळी केली होती.

दोन्ही डावांत शतक झळकावणारा पंत 7वा भारतीय

कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावणारा ऋषभ पंत हा भारताचा पहिला यष्टिरक्षक-फलंदाज आणि एकूण सातवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विजय हजारे, सुनील गावस्कर (3 वेळा), राहुल द्रविड (2 वेळा), विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांनी हा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू आहे. यासोबतच, आजपर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतक झळकावता आले नव्हते.

आधी राहुल आणि नंतर पंतने पूर्ण केले शतक

आता ऋषभ पंत जगातील असा पहिला फलंदाज ठरला आहे, ज्याने यष्टीरक्षक म्हणून खेळताना एकाच कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये शतक लगावले आहे. ऋषभ पंतच्या आधी, केएल राहुलनेही दुसऱ्या डावात आपले शतक पूर्ण केले. यामुळे भारतीय संघ अत्यंत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. लीड्स कसोटीचा सध्या चौथा दिवस सुरू आहे, परंतु येथून भारतीय संघ सामना गमावेल असे वाटत नाही. सामना अनिर्णित राहू शकतो, पण इंग्लंडच्या अडचणी मात्र येथून वाढतच जाणार आहेत. त्यांना सामना वाचवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल.

२०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे एकाच कसोटीत शतक आणि अर्धशतक

२०२२ मध्ये जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आला होता, तेव्हा बर्मिंगहॅम येथे खेळल्या गेलेल्या कसोटीच्या एका डावात त्याने शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले होते. ‘सेना’ (SENA) देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) आशियाई यष्टीरक्षक म्हणून अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला होता. ही कामगिरी पंतने २०२२ मध्ये केली होती, पण तीन वर्षांनंतर पुन्हा इंग्लंड दौऱ्यावर पंतने त्याहूनही मोठी कामगिरी करून दाखवली आहे, जी एक विश्वविक्रम आहे.

आक्रमक शैलीत पूर्ण केले शतक

ऋषभ पंतने लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात १३४ धावांची दमदार खेळी केली होती. यासाठी पंतने १७८ चेंडूंचा सामना केला. या खेळीदरम्यान त्याने १२ चौकार आणि सहा गगनचुंबी षटकार लगावले. तरीही त्याची धावांची भूक शमली नाही आणि त्याने दुसऱ्या डावातही भरपूर धावा जमवल्या. दुसऱ्या डावात पंतने आपले शतक केवळ १३० चेंडूंमध्ये पूर्ण केले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १३ चौकार आणि २ षटकार आले. अशाप्रकारे, पंतने पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये आपली छाप पाडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT