नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याला इंग्लंड दौर्यात झालेली दुखापत अपेक्षेपेक्षा गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तो आगामी आशिया चषक 2025 स्पर्धेला पूर्णपणे मुकणार आहे, तर ऑक्टोबर महिन्यात होणार्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेतील त्याच्या सहभागावरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंतच्या अनुपस्थितीमुळे, विशेषतः कसोटी संघात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून, संघाच्या नियोजनाला मोठा धक्का बसला आहे.
ही दुखापत इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर 23 ते 27 जुलैदरम्यान झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी झाली. भारतीय डावादरम्यान, वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर पंतने आपला नेहमीचा आक्रमक पवित्रा दाखवत रिव्हर्स स्वीपचा धाडसी फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच प्रयत्नात चेंडू थेट त्याच्या पायाच्या बोटावर आदळला आणि त्याला गंभीर दुखापत झाली.
सुरुवातीला ही दुखापत किरकोळ वाटत असली तरी, नुकत्याच समोर आलेल्या वैद्यकीय अहवालानुसार पंतच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर असल्याचे निदान झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, या दुखापतीसाठी शस्त्रक्रियेची गरज नाही. मात्र, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला किमान सहा आठवड्यांची सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
पंतच्या अनुपस्थितीमुळे इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल याला संधी देण्यात आली होती. आता जर पंत वेस्ट इंडिज मालिकेसाठी उपलब्ध नसेल, तर आग्य्राच्याच या उदयोन्मुख खेळाडूलाच यष्टिरक्षणाची धुरा सांभाळावी लागण्याची दाट शक्यता आहे.
मर्यादित षटकांमध्ये कमी फटका : आशिया चषक ही टी-20 स्वरूपात खेळवली जाणार आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये (टी-20 आणि एकदिवसीय) पंत हा भारताचा पहिला पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज नाही. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीचा संघाच्या संतुलनावर फारसा परिणाम होणार नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये मोठे नुकसान : कसोटी संघात मात्र पंतची अनुपस्थिती हा संघासाठी एक जबरदस्त धक्का आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर होण्यापूर्वी त्याने 4 सामन्यांमध्ये 2 शतके आणि 3 अर्धशतकांसह 479 धावा कुटल्या होत्या. त्याची आक्रमक फलंदाजी आणि कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता भारतीय संघासाठी अमूल्य होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संघाला त्याची मोठी उणीव भासेल.