Rishabh Pant  file photo
स्पोर्ट्स

IND vs ENG 4th Test : मँचेस्टर कसोटीत पंत केवळ फलंदाजाच्या भूमिकेत? संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढवली

लॉर्डस् कसोटीत यष्टिरक्षण करताना पंतच्या दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या.

रणजित गायकवाड

मँचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासमोर चौथ्या आणि ‘करो या मरो’च्या मँचेस्टर कसोटीपूर्वी मोठी अडचण निर्माण झाली आहे. संघाचा उपकर्णधार आणि यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दुखापतग्रस्त असून, तो या महत्त्वाच्या सामन्यात यष्टिरक्षण करू शकेल की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे तो केवळ स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लॉर्डस् कसोटीत यष्टिरक्षण करताना पंतच्या डाव्या हाताच्या तर्जनीला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या आणि त्याने उर्वरित सामन्यात यष्टिरक्षण केले नव्हते. आता 23 जुलैपासून सुरू होणार्‍या मँचेस्टर कसोटीपूर्वी पंत पूर्णपणे तंदुरुस्त व्हावा, यासाठी संघ व्यवस्थापन त्याला जास्तीत जास्त वेळ देत आहे.

भारतीय संघाचे सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही ऋषभला बरे होण्यासाठी पुरेसा वेळ देत आहोत. तो फलंदाजी नक्कीच करेल, पण यष्टिरक्षण करणे हे त्याच्या तंदुरुस्तीच्या प्रक्रियेचा शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा असेल. आम्हाला सामन्याच्या मध्यात यष्टिरक्षक बदलावा लागण्याची परिस्थिती पुन्हा नको आहे.

पंत पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास, लॉर्डस् कसोटीत यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळलेला युवा खेळाडू ध्रुव जुरेल मँचेस्टरमध्येही ही भूमिका पार पाडू शकतो. डोशेट यांनी सांगितले की, जुरेल नक्कीच आमच्या विचारात आहे, पण जर ऋषभ तंदुरुस्त असेल, तर तोच खेळेल आणि दोन्ही जबाबदार्‍या पार पाडेल.

सर्व आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरीचे आव्हान

कर्णधार शुभमन गिलने यापूर्वीच सांगितले होते की, पंत वेदना सहन करूनही खेळण्यास उत्सुक आहे. मात्र, संघ व्यवस्थापन कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. पंतच्या दुखापतीसोबतच, भारतीय संघाला सलग गडी गमावण्याच्या समस्येवरही मात करावी लागणार आहे. त्यामुळे मँचेस्टरमध्ये विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघाला फलंदाजी आणि यष्टिरक्षण या दोन्ही आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT